अनेक आरोपांनी वादग्रस्त ठरलेले आणि प्रसंगी स्वपक्षनेतृत्वाला न जुमानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे शनिवारी नवी दिल्लीत भाजपमध्ये समारंभपूर्वक प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी उदयनराजेंना भाजपचे सदस्यत्व बहाल केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सातारा येथे आली असता भाजपाच्या मंचावरुन पहिल्यांदाच भाषण देताना उदयनराजेंनी मोदींचे कौतुक केला. मात्र असे असतानाच उद्यनराजे भाजपामध्ये जाणारा याची चाहूल लागल्यापासून त्यांनी मोदींवर केलेल्या टिकेचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘कोण मोदी? मोदी साताऱ्याला पेढेवाले आहेत,’ अशी टीका उदयनराजे यांनी केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ‘मला पन्नास दिवस द्या. पन्नास दिवसात सर्व काही पूर्वव्रत होईल,’ असं एका भाषणामध्ये म्हटलं होतं. याचवेळी कराडमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार असणाऱ्या उदयनराजे यांनी यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंनी मोदींवर टीका केली होती. ‘अरे क्या पचास दिन दो. इथे शेतकऱ्यांना खायला अन्न नाही. शेतकऱ्यांची वाट लागलीय. शेतीमाल सडत पडलाय आणि पंतप्रधान म्हणतात पचास दिन रुको. अरे कोण थांबणार आहे. मोठं काही झालं तर जाळपोळ सुरु होईल. थांबवणार कोण हे सगळं? असं झालं तर या सर्वाला मोदी सरकार आणि त्यांचं शासन जबाबदार असेल,’ अशी टीका उदयनराजे यांनी केली होती. पुढे बोलताना त्यांनी मोदींवर टिका करताना, ‘माझे अनेक मित्र भाजपामध्ये आहेत. भाजपाचे अनेक आमदार आणि खासदार मूग गिळून का गप्प आहेत? तुम्ही बोलायला घाबरता कशाला असा सवाल केल्यावर ते म्हणतात अरे वो मोदी असं म्हणतात. अरे मोदी हैं तो क्या? आमच्या इथं साताऱ्याला मोदी पेढेवाले आहेत,’ असा टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

याच व्हि़डिओमध्ये उदयनराजेंनी मोदींवर सडकून टीका केल्याचे दिसते. ‘हा मोदी एवढा मोठा कोण लागून गेला?’ असा सवाल उद्यनराजेंनी उपस्थित करत नोटबंदीनंतरच्या परिस्थितीवर आपला राग व्यक्त केला होता. ‘मला मोदींना एक सांगावसं वाटतं. समाजामुळे तुम्ही आम्ही आहोत. तुमच्यामुळं किंवा एकट्या कुठल्या व्यक्तीमुळे समाज नाहीय हे लक्षात घ्या. माझ्या मते (नोटबंदीचा निर्णय) हा पूर्णपणे मोदींचा मुर्खपणा आहे. या देशात लोकशाही आहे हे त्यांना कळत नाही. या देशात हुकूमशाही चालत नाही. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो व्यवस्थित चर्चा करुन घेतला पाहिजे,’ असं उद्यनराजे यावेळी म्हणाले होते. काळ्या पैश्यावर कारवाई करण्यासाठी नोटबंदी केल्याचा सरकारच्या दाव्यावरही उदयनराजेंनी टीका केली होती. ‘यांना माहिती नाही काळा पैसा कोणाकडे आहे. यांच्याकडे आयबी आहे, ईडी आहे इतकचं नाही रॉ, सीबीआय आणि आरबीआय सारख्या संस्थाही आहेत तरी भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात आली नाही. एवढ्या सगळ्या संस्था असताना ज्या फाईल पेंडींग पडून आहेत त्यांच्यावर सरकारने का कारवाई केली नाही? थोडा कर कमी केला असता तर लोकांनी स्वत:हून दंड भरला असता,’ असं मत उदयनराजेंनी नोंदवलं होतं.

तसेच मुठभर लोकांनी भ्रष्टाचार केला तर संपूर्ण देशाला मोदी सरकारने नोटबंदी कारुन का वेठीस धरले आहे असा सवालही उद्यनराजेंनी उपस्थित केला होता. ‘या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला फार मोठ्याप्रमाणात धोका निर्माण झाला आहे. कुठल्याही क्षणी लोकांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो. वणाव पेटल्यानंतर तो कोणी थांबू शकत नाही तशी परिस्थिती निर्माण होईल. देशात जंगलराज येईल. काही मिळालं नाही तर लोकं बँकेत जाऊन बँका लुटतील,’ अशी भितीही उदयनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली होती.

दरम्यान, रविवारी साताऱ्यात झालेल्या महाजनादेश यात्रेच्या सभेमध्ये उदयनराजेंनी पहिल्यांदाच भाजपाच्या मंचावरुन भाषण केले. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणामध्ये उदयनराजेंनी आपण राष्ट्रवादीमध्ये असताना कशाप्रकारे आपल्याला डावलले गेले, अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे घालूनही आपली कामे कशाप्रकारे झाली नाहीत यासारख्या अनेक विषयांवर भाष्य करत राष्ट्रवादीवर टिका केली.