छोटं का असेना पण आपलं सुंदर आणि हक्काचं घर असावं असं कोणाला नाही वाटणार. पण जगाच्या पाठीवर अनेक देशात घरांच्या किंमती या गगनाला भिडल्या आहेत. तिथे घर घेणं हे फक्त आता सामान्य माणसांचं पूर्ण न होऊ शकणारं स्वप्न बनलं आहे. एकीकडे घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्या तरी इटलीमधील एक गावानं चक्क शेकडो घरं १ युरो म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे साधरण ८० रुपयांना विकायला काढली आहेत. आता ८० रुपयांत घरासाठी एक लादीही मिळणं मुश्किल झालं आहे तिथे ८० रुपयांत घर विकायला काढणं ही काय भानगड आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

इटलीत ओलोलाई हे गाव आहे. इथल्या गावकऱ्यांनी आपली घरं १ युरोत विकायला काढली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या सुंदर गावात दगडाचं बांधकाम असलेली शेकडो घरं आहेत. पण, या घरात मात्र आता कुणीही राहत नाही. या गावची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आपलं गाव हळूहळू निर्मनुष्य होईल अशी भीती गावकऱ्यांना सतावत आहे. म्हणूनच गावकऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या गावात वस्ती करावी यासाठी १ युरोत घरं विकायला काढली आहेत. दगडाचं बांधकाम असलेल्या या घरांना डागडुजीची गरज आहे. तेव्हा पुढील तीन वर्षांत या घरांची खरेदीदारानं डागडुजी करावी या एका अटीवर या घरांची विक्री करण्यात येत आहे असं ‘सीएनएन’नं म्हटलं आहे. या घरांचा डागडुजीचा खर्च भारतीय मूल्याप्रमाणे साधरण १६ लाखांच्या घरात आहे.

घर खरेदी करणाऱ्यांनी इथे राहावं देखील अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. या गावात पूर्वी अडीच हजार लोक राहत होते. आता या गावची लोकसंख्या फक्त १ हजार ३०० आहे. गावात दरवर्षी फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मुलांचा जन्म होतो. जर नवीन लोक इथे राहायला आले तर गावातील लोकांना रोजगार मिळेल अशी आशा त्यांना आहे. कारण या गावातील मोठा वर्ग हा कारागीर आहे. १ युरोत घरे विक्रीसाठी आहेत ही गोष्ट अनेकांना माहिती झाली असून घर खरेदी करण्यासाठी जगभरातील लोक गावात येत असल्याचं गावकऱ्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.