बिहारमधील गया ते दिल्ली या मार्गावरील विमानाचे सारथ्य करणाऱ्या महिला पायलटला पाहून एका आजीबाईंनी आश्चर्य व्यक्त करत भन्नाट प्रतिक्रिया दिली. आजीबाईंनी व्यक्त केलेल्या भावना संबंधित महिला पायलटने सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाली असून यावर हजारो लाईक्सचा पाऊस पडला तसेच हजारो युजर्सने ती शेअरही केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

हिना खान या व्यवसायिक पायलट आहेत. त्या १५ नोव्हेंबर रोजी दिल्ली-गया-दिल्ली या मार्गावरील एका विमानात ड्युटीवर होत्या. या दिवशी विमानात एक असा किस्सा घडला जो हिना यांच्या कायमच स्मरणात राहणारा आहे. विमानात सर्वकाही सर्वसामान्य असताना हरयाणाच्या एका ज्येष्ठ महिला प्रवाशाने विमानात पायलट बसतात त्या कॉकपिटमध्ये डोकावले तर त्यांना तिथे विमान उडवणाऱ्या हिना खान दिसल्या. एक विमान चालवणारी महिला पायलट पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि तत्काळ त्यांच्या तोंडून शब्द निघाले, “ओय यहां तो छोरी बैठी है!” आजीबाईंची ही प्रतिक्रिया ऐकून विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये हास्याचे कारंजे फुटले. महिलाही विमान उडवू शकतात हे कदाचित या आजीबाईंना माहिती नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी हिना खान यांना कॉकपिटमध्ये पाहून आश्चर्य व्यक्त केले. या आजीबाईंना हिना यांचा अभिमानही वाटला. त्यामुळेच हिना यांच्यासाठी ही बाब लाखमोलाची होती. त्यामुळे त्यांना ही बाब ट्विटरवरुन शेअर करावीशी वाटली. दिल्लीत परतल्यानंतर विमानात हा किस्सा घडला होता.

हिना यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या

हिना खान यांच्या या ट्विटर पोस्टला १५,००० लाईक्स मिळाल्या असून जवळपास १,००० जणांनी ती पोस्ट रिट्विट केली. कमेंट सेक्शनध्ये लोकांनी त्यांचे विचार व्यक्त करीत मतंही मांडलं. एका नेटकऱ्यानं म्हटलं, “या आजीबाई नक्कीच हा किस्सा आपल्या समाजातील अनेकांना सांगतील. त्यामुळे तो इतर महिलांसाठीही प्रेरणादायी असेल यात शंकाच नाही. तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्थान असाल.” अशा शब्दांत त्याने हिना यांचेही कौतुक केले.

दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं की, या घटनेमुळे त्या आजीबाईंचा आजपर्यंत जीवनात निर्माण झालेला महिलांबाबतचा दृष्टीकोनही बदलेल.