चीनमधील फूयू शहरातील स्थानिकांसाठी २०१९ चा शेवटचा दिवस अगदीच खास ठरला. या दिवशी या शहरातील नागरिकांना एकाच वेळी चक्क तीन सूर्य पहायला मिळाले. अनेकांना आकाशामध्ये तीन सूर्य पाहून धक्काच बसला.

नक्की काय दिसलं आकाशात?

फूयू शहरामधून आकाशात सुर्याच्या दोन्ही बाजूला दोन अर्धाकृती प्रकाश गोळे दिसत होते. मधोमध सूर्य आणि दोन्ही बाजूला दोन लहान सूर्य असाच हा नजारा वाटत होता. जीलीन प्रांतातील बऱ्याच ठिकाणावरुन आकाशामध्ये सुर्याच्या दोन्ही बाजूला हे गोळे दिसत होते. जवळजवळ २० ते २५ मिनिटांसाठी हा नजारा आकाशात दिसत होता.

काय म्हणतात या प्रकाराला?

अनेकांना सूर्याच्या बाजूचे गोळे लहान सूर्यांसारखे भासले तरी हा दुर्मिळ योग एका वैज्ञानिक कारणामुळे जुळून आला. अशाप्रकारे सुर्याचेच प्रतिबिंब वातावरणामधील घटकांवर पडण्याच्या घटनेला वैज्ञानिक भाषेत अॅटमोस्पिअरिक ऑप्टीकल फिनॉमीनॉन (atmospheric optical phenomenon) असं म्हणतात. याला सन डॉग किंवा पार्हिलायन असही म्हणतात.

नक्की काय घडतं?

‘पृथ्वीच्या वातावरणामधील बर्फाच्या कणांवरुन सुर्यकिरणे परावर्तित होतात. त्यामुळे सुर्याभोवती दोन्ही बाजूला प्रकाशमान गोळे असल्याचा भास निर्माण होतो. सुर्यापासून उजव्या आणि डाव्याबाजूला अंदाजे २२ अंशामध्ये हे गोळे दिसतात यालाच सन डॉग असं म्हणतात,’ असं आरटी डॉटकॉमने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

…तरच तयार होतात हे प्रकाशगोळे

अशाप्रकारे सूर्याचा प्रकाश वातावरणातील बर्फाच्या कणांवरुन परावर्तित होण्यासाठी वातावरण थंड असणे गरजेचे असते. अंदाजे उणे २० डिग्री सेल्सियस तापमानामध्ये सूर्य क्षितीजावर असेल तर अशाप्रकारचा नजारा आकाशात दिसतो.