भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग नेहमी त्याच्या वेगळ्या ट्विट्समुळे आणि विविध विधानांमुळे चर्चेत असतो. यावेळी सेहवागने, “सौरव गांगुली एक दिवस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष बनेल अशी भविष्यवाणी २००७ सालीच केली होती”, असा दावा केला आहे. यासोबतच, “अन्य एक भविष्यवाणी देखील केली होती. मात्र अद्याप ती खरी होण्याची वाट पाहतोय”, असंही सेहवागने म्हटलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसमधील लेखात, ‘पहिल्यांदा जेव्हा दादा बीसीसीआयचा अध्यक्ष होणार असल्याचं ऐकलं तेव्हा मला २००७ सालची एक घटना आठवली’ असं सेहवागने म्हटलंय. “आफ्रिका दौऱ्यामध्ये केपटाउन कसोटीत मी आणि वासिम जाफर झटपट बाद झालो होतो. चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर फलंदाजी करणार होता, पण काही कारणास्तव तो फलंदाजीसाठी उतरु शकला नाही. त्यामुळे गांगुलीला फलंदाजीला जाण्यास सांगण्यात आलं. ती मालिका गांगुलीच्या टीम इंडियातील पुनरागमनाची मालिका होती, परिणामी दादावर प्रचंड दबाव होता. पण, ज्याप्रकारे गांगुलीने फलंदाजी केली आणि दबाव व तणाव हाताळला…ते फक्त गांगुलीच करु शकत होता. त्यादिवशी ड्रेसिंग रुममधील आम्ही सर्व खेळाडू एका बाबतीत सहमत होतो ती म्हणजे, आम्हा सर्व खेळाडूंमध्ये कोणी बीसीसीआयचा अध्यक्ष बनू शकतो तर तो केवळ दादाच आहे. त्यावेळी मी, गांगुली एक दिवस बंगालचा मुख्यमंत्रीही बनू शकतो असे म्हटले होते”, असं १२ वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा देताना सेहवागने म्हटलंय. त्यामुळे, माझी एक भविष्यवाणी खरी झालीये आता दुसऱ्या भविष्यवाणीचं काय होतं ते बघू, असं देखील सेहवागने म्हटले आहे.

गांगुलीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील वर्षी वर्षी जुलै महिन्यात संपणार आहे. पण, भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर पुढील कसोटी सामने थेट डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत खेळणार आहे.