भारतातील बऱ्याच शहरांमध्ये माणसांनी भरुन जाणाऱ्या रेल्वे गाड्या, बस, रिक्षा हे नेहमीचे चित्र पहायला मिळते. मात्र, आता हा ट्रेन्ड हळूहळू दुचाकीबाबतही पहायला मिळत आहे. कारण, एक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जण आपला पाळीव कुत्रा आणि कोंबडीसह बाईकवरुन प्रवास करताना दिसत आहेत.

बाईकवरुन असा प्रवास करणाऱ्या कुटुंबाचा व्हिडिओ ट्विटरवर पहिल्यांदा रिशद कूपर नामक व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने ‘ओन्ली इन इंडिया’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओ क्लिपला सध्या ८०० पेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून तो ३३० पेक्षा अधिक युजर्सने रिट्विट केला आहे. तसेच त्यांनी हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.

या व्हिडिओत दिसते की, नवरा-बायको आणि त्यांची पाच मुलं हे एकाच बाईकवरुन विनाहेल्मेट प्रवास करीत आहेत. यांपैकी एका मुलाने आपल्या एका हातात पाळीव कोंबडीला पकडले आहे. तर पाळीव कुत्रा दुचाकीला जोडलेल्या एका जोडभागात बसलेला आहे. जेव्हा या चित्रीकरणाचा कॅमेरा त्यांच्या जवळ जातो तेव्हा एक छोटा मुलगा दुचाकीच्या पुढे हेडलाईटच्या मागे छोट्याशा जागेत आणखी एका कुत्र्याला आपल्या मांडीवर घेऊन बसलेला दिसतो. इतकेच नव्हे या कुटुंबाच्या बऱ्याच बॅगा आणि भांडीकुंडीही त्यांनी या बाईकवरच लादलेली आहेत. तसेच एक मोठा बांबू या बाईकच्या मागच्या बाजूला बांधण्यात आला आहे ज्याने रस्त्याचा दोन ते तीन मीटरचा भाग व्यापला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्सने बाईक चालवणाऱ्याच्या तोल सांभाळण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी अशा प्रकारचा स्टंट धोकादायक असून पोलिसांनी त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, मला या कुटुंबाची ईर्षा वाटते कारण, हे धोकायदायक असल्याचे माहिती असतानाही या गरीब कुटुंबात एकमेकांबद्दल किती विश्वास आहे. अनेकांना अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा विश्वास बांधून ठेवता येत नाही. तर आणखी एकाने लिहिले आहे की, बाईक चालवणारा खरा हिरो आहे, त्याच्याकडे आपल्या जीवनात संतुलन राखण्याची कला आहे.

काही दिवसांपूर्वी तेलंगाणातील असाच एक व्हायरल व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये एक पोलीस कर्मचारी एका धावत्या रिक्षाला थांबवतो आणि रिक्षा चालकावर प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी रिक्षात भरल्याप्रकरणी कारवाई करताना दिसतो. त्याने रिक्षात बसलेल्या लोकांना एकामागून एक बाहेर पडायला सांगितल्यानंतर महिला आणि लहान मुले मिळून यातून तब्बल २४ जण बाहेर पडतात.