कर्करोगग्रस्त असलेल्या पाच वर्षाच्या मुलाच्या मदतीला चक्क चार हजार आठशे ५५ लोक धावले आहेत. विशेष म्हणजे एका सोशल मीडियाच्या पोस्टमुळे एकाच दिवशी एवढ्या लोकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा विषय सध्या चर्चेत आहे.

ब्रिटनमधील एका पाच वर्षीय मुलाला रक्त देण्यासाठी तब्बल ४८५५ लोकांनी हजेरी लावली. या मुलाचे नाव ऑस्कर सॅक्स्लबाय ली असे आहे. पिटमास्टन नामक एका प्राथमिक शाळेने पाच वर्षीय कर्करोगग्रस्त ऑस्करला रक्ताची गरज असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली होती. पाहता पाहता ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की एकाच दिवशी ४८५५ लोक ऑस्करला रक्त देण्यासाठी हजरी लावली. आश्चर्याची बाब म्हणजे जोरदार पावसातही या सर्वांनी रांगेत उभे राहुन आपले नाव नोंदवत रक्ताची चाचणी केली.

बालवाडीत शिकणाऱ्या चिमुकल्या ऑस्करला रक्ताचा कर्करोग झाला आहे. या दुर्मिळ रोगामुळे महिन्यातुन दोनदा त्याच्या शरिरातील संपूर्ण रक्त बदलावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासते. परंतु अनेकदा रक्ताच्या टंचाईमुळे ऑस्करवरील उपचार पुढे ढकलावे लागतात. यावर उपाय म्हणुन पिटमास्टन शाळेने ऑस्करसाठी एक खास रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या शिबिराद्वारे त्यांनी चिमुकल्याची मदत करण्याचे आवाहन केले. त्याबाबतची पोस्ट त्यांनी ट्विटरवरही अपलोड केली होती. ती पोस्ट वाचून तब्बल ४८५५ लोक ऑस्करला रक्त देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेले लोक पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.