तामिळनाडूमध्ये सध्या एका जोडप्याच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या लग्नाच्या पत्रिकेतील वधू आणि वराचे नाव वाचून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पी. ममता बॅनर्जी आणि ए.एम. सोशलिझम अशी या वधू-वरांची नावे आहेत. वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या या पत्रिकेत ज्येष्ठ बंधू म्हणून एएम कम्युनिझम आणि एएम लेनिनिझम ही नावे देखील आहेत.

ही लग्नाची पत्रिका पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या जोडप्याच्या कुटूंबातील सदस्यांनी ही पत्रिका खरी असल्याची देखील मान्य केले आहे. पत्रिकेतील ए.एम. सोशलिझम हा लेनिन मोहन यांचा मुलगा आहे. लेनिन मोहन हे तामिळनाडूच्या सालेममधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव आहेत. ए मोहन म्हणून लोकप्रिय असलेले लेनिन मोहन सालेममधील पनामारथूपट्टी नगरसेवक देखील आहेत.

गावात रशिया, मॉस्को, रोमानिया, व्हिएतनाम नावाच्या व्यक्ती

इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना मोहन यांनी आपल्या मुलांची नावे अशी का ठेवली याबद्दल माहिती दिली. “सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर लोक म्हणत होते की साम्यवाद संपला आहे आणि जगात त्याची कुठेही विचारधारा समृद्ध होणार नाही. या संदर्भात दूरदर्शनवर एक बातमी आली आणि त्यावेळी माझ्या पत्नीने माझ्या मोठ्या मुलाला जन्म दिला. मानवजात अस्तित्त्वात आहे तोपर्यंत कम्युनिझम कोसळणार नाही असा विश्वास असल्यामुळे मी त्याचे नाव कम्युनिझम ठेवण्याचे तत्काळ ठरवले,” असे मोहन यांनी सांगितले. कट्टूर गावात बहुसंख्य लोक साम्यवादी विचारांचे आहेत. तिथे रशिया, मॉस्को, चेकोस्लोवाकिया, रोमानिया, व्हिएतनाम, व्हेन्मानी इत्यादी नावाच्या लोकांना शोधणे फार कठीण नाही असे मोहन पुढे म्हणाले.

हे ही वाचा >> काखेत कळसा अन्… बेपत्ता तरुणीने ११ वर्षांपासून शेजारच्याच घरात प्रियकरासोबत थाटला संसार

नेते, देश, विचारसरणीवरुन नाव ठेवण्याची परंपरा

“गावात नेते, देश, विचारसरणी यांवरुन लोक आपल्या मुलांचे नाव ठेवतात. मला माझ्या मुलांचे नाव विचारधारेवर ठेवायचे होते. तिन्ही मुलाची नावे एकसारखी आहेत. मुलगी देखील आमची नातेवाईक आहे. तिचे आजोबा एक काँग्रेसचे सदस्य आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्या कामातून खूप प्रेरित झाले होते आणि म्हणूनच त्यांना आपल्या नातीचे नाव त्यांच्या नावावर ठेवायचे होते. भावी पिढ्यांनी आपली विचारसरणी पुढे आणावी अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. मी माझ्या नातवाचे नाव मार्क्संसिझम ठेवले आहे. भविष्यात जर आमच्या कुटुंबात मुलगी जन्माला आली तर मी तिचे नाव क्युबीझम ठेवेन,”असे मोहन पुढे म्हणाले.

पाकिस्तानची चेष्टा केल्याने झाली नाराज; प्रियकरासोबत ठरलेलं लग्न अभिनेत्रीने मोडलं

कोविड -१९ मुळे लोकांना लग्नासाठी आमंत्रित करू शकत नसल्याने त्यांनी ‘सीपीआय’चा तमिळ मुखपत्र असलेल्या ‘जन शक्ती’मध्ये ही पत्रिका छापली होती. याआधी मोहन यांनी मोठ्या मुलाच्या लग्नावेळीदेखील याप्रकारे पत्रिका छापली होती.