पद्मश्री पुरस्कार विजेते आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष के के अग्रवाल यांचं सोमवारी करोनामुळे निधन झालं. नवी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून ते करोनाशी लढा देत होते. सोमवारी रात्री ११.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोना संकटात केके अग्रवाल व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करत होते. याशिवाय त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवले होते. आपल्या शेवटच्या क्षणांमध्येही त्यांनी लोकांचीच चिंता होती. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

के के अग्रवाल करोना महामारीबद्दल माहिती देण्यासाठी तसंच शंका दूर करत लोकांपर्यंत व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचत होते. करोना झाल्यानंतरही त्यांनी आपलं हे काम सुरु ठेवलं होतं. या व्हिडीओत ते डॉक्टरांना जुगाडू ओपीडीची संकल्पना सांगत जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्यास सांगत आहेत. तसंच ‘शो मस्ट गो ऑन’ असा उल्लेख करत कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये असा सल्ला देत आहेत.

पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे करोनामुळे निधन, लसीचे घेतले होते दोन्ही डोस

“मलादेखील करोना झाला आहे. मला कोविड न्यूमोनिया झाला आहे. पण राज कपूर यांचे शब्द लक्षात ठेवा…शो मस्ट गो ऑन..पिक्चर अभी बाकी है. माझ्यासारखे लोक ऑक्सिजनवरही क्लास घेऊन लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. समाजाच्या दृष्टीने हेच आमचं काम आहे. मी केके अग्रवाल नसून वैद्यकीय विभाग आहे,” असं ते सांगत आहे.

या व्हिडीओत के के अग्रवाल डॉक्टरांना जुगाडू ओपीडी संकल्पना सांगत आहेत. “समान लक्षणं असणाऱ्या १०० लोकांना एकत्र बोलवा आणि त्यांना सूचना द्या. १५ मिनिटांसाठी समुपदेशन करुन परत पाठवा. प्रत्येकाला स्वतंत्र बोलवून सूचना देण्याची वेळ गेली आहे. आपल्याला लोकांना संकटातून बाहेर काढायचं आहे. १०० जणांचा ग्रुप करा असं डॉक्टरांना माझं आवाहन आहे. झूमवर सर्वांना बोलवा…१५ मिनिटांत आपण १०० लोकांना समजावू शकतो. परिस्थिती काही असली तरी शो मस्ट गो ऑन. आपल्या ओपीडीचं जुगाडू ओपीडीमध्ये रुपांतर करुन लोकांना बरं करा,” असं आवाहन त्यांनी डॉक्टरांना केलं होतं.

के के अग्रवाल करोनाची लागण झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून एम्स रुग्णालयात दाखल होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. “जेव्हापासून ते डॉक्टर झाले तेव्हापासून त्यांनी आपलं आयुष्य लोकांच्या भल्यासाठी तसंच आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी समर्पित केलं होतं,” असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.