एका जर्मन खलाश्यानं जीन्सपँट आणि छोटीशी युक्ती वापरून बुडण्यापासून स्वत:चा जीव वाचवला आहे. या जर्मन खलाश्यानं जीव वाचवण्यासाठी वापरलेल्या युक्तीचं कौतुक आता सोशल मीडियावरही होत आहे.

वय वर्षे ३० असलेल्या अर्ने मुर्के हा खलाशी आपल्या भावासोबत न्यूझीलंडच्या एका बेटावर समुद्रसफारीला निघाला होता. मात्र अर्ने अनपेक्षितरित्या धक्का लागून यॉटवरून समुद्रात पडला. लाइफ जॅकेट त्याला मिळणार एवढ्यात लाटांमुळे तो यॉटपासून दूर फेकला गेला. पाण्याच्या प्रवाहामुळे अर्ने दूर गेला. पाण्यात तरंगण्यासाठी लाइफ जॅकेट लागतं मात्र अर्नेकडे ते नव्हतं. पण यामुळे खचून न जाता जिवंत राहण्यासाठी त्यानं नवी युक्ती शोधली.

अर्नेनं आपल्या जीन्सपँटचा लाइफ जॅकेटप्रमाणे वापर केला. त्यानं पँट काढून तिच्या दोन्ही टोकांना घट्ट गाठ बांधली. ही पँट पाण्याच्या पृष्ठभागावर नेतं त्यानं हवा भरली. ही युक्ती त्यानं यापूर्वी पाहिली होती. त्यामुळे त्यानं ही युक्ती वापरत जीन्सचा लाइफ जॅकेटप्रमाणे वापर केला. दोन तास तो समुद्रात होता. मी ही युक्ती वापरली नसती तर कदाचीत मी वाचलो नसतो असं अर्ने म्हणाला.  दोन तासानंतर त्याला वाचवण्यात यश आलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.