पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक नईम उल हक यांना त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. नईम यांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्याऐवजी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा फोटो वापरला.


नईम उल हक यांनी आपल्या ट्विटरवर सचिन तेंडुलकरचा क्रिकेटच्या पदार्पणातील फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये, पीएम इम्रान खान, १९६९. असे लिहिले. हा फोटो ट्विटरवर पोस्ट होताच ट्विटर युजर्संनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. कुणाचंही नाव देऊन विविध क्षेत्रातील दिग्गजांचे फोटो युजर्स शेअर करत आहेत. एका युजरने एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा फोटो वापरुन हा फोटो पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर यांचा असल्याचं ट्विट केलं आहे.


तर एकाने, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील जेठालाल यांचा फोटो ट्विट करुन ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचा फोटो असल्याचं म्हटलंय.