चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्रावरील लँडिंग अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानचे विज्ञान मंत्री फवाद चौधरी भारताविरोधात बरळले होते. पण पाकिस्तानच्या पहिल्या महिला अंतराळवीर नमिरा सलीम यांनी भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. नमिरा सलीम यांनी चांद्रयान-२ मोहिमेबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. हा एक ऐतिहासिक प्रयत्न होता असे त्या म्हणाल्या.

“चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरवण्याचा जो ऐतिहासिक प्रयत्न केला त्याबद्दल मी भारत आणि इस्रोचे अभिनंदन करते” कराचीमधील ‘सायन्शिया’ या डिजिटल सायन्स मॅगझिनला नमिरा यांनी ही प्रतिक्रिया दिली. “चांद्रयान-२ मोहिम ही संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक मोठी झेप आहे. फक्त दक्षिण आशियाच नव्हे तर संपूर्ण जागतिक अवकाश समुदायासाठी ही अभिमानाची बाब आहे” असे नमिरा सलीम म्हणाल्या.

“दक्षिण आशियाची अवकाश क्षेत्रातील प्रादेशिक प्रगती लक्षणीय आहे. कुठला देश यामध्ये पुढे आहे हे महत्वाचे नाही. अवकाशात सर्व राजकीय सीमा संपुष्टात येतात” असे त्या म्हणाल्या. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. इस्रोने आता लँडरचा फोटो मिळवला असून विश्लेषण सुरु आहे. भले भारताला पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर लँडर उतरवण्यात अपयश आले असेल पण जगभरातून भारताच्या या साहसी मोहिमेचे कौतुक होत आहे.