पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने (पीटीए) काही दिवसांपूर्वी ऑनलाइन बॅटल गेम ‘प्लेयर अननोन बॅटलग्राउंड’ (Player Unknown’s Battle grounds) अर्थात पब्जीवर बंदी घातली होती. त्यानंतर आता लाइव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप्लिकेशन ‘बिगो लाइव्ह’वरही (Bigo Live App) बंदी घातली आहे. तसेच, पीटीएने ‘अश्लील’ आणि ‘अनैतिक’ सामग्रीमुळे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप्लीकेशन टिकटॉकलाही अंतिम इशारा दिला आहे.

समाजातील विविध वर्गांमधून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक आणि बिगो लाइव्हवरील ‘अनैतिक आणि अश्लील’ सामग्रीबाबत तक्रारी येत होत्या. त्यानंतर बिगोवर बंदी घालण्यात आली असून टिकटॉकला अंतिम इशारा देण्यात आला आहे ,अशी माहिती पीटीएकडून सोमवारी देण्यात आली.

“तक्रारी मिळाल्यानंतर या कंपन्यांना नोटीस देण्यात आली होती, पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे बिगो लाइव्हला तातडीने ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच टिकटॉकला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अनैतिक सामग्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्र विकसित करण्याचा इशारा देण्यात आला आहे”, अशी माहिती पीटीएकडून देण्यात आली.

जुलै महिन्याच्या सुरूवातीला पीटीएने पब्जी गेमवरही बंदी घातली होती. त्यावेळी, ‘हा गेम एखाद्या व्यसनाप्रमाणे असून यामुळे मुलांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. तसेच, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पब्जीमुळे तरुणांनी आत्महत्या केल्याचं वृत्तही आलं होतं. त्यानंतर गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला’ असं पीटीएकडून सांगण्यात आलं होतं.