पाकिस्तान सरकारमधील सागरी वाहतूक मंत्रालयाचे मंत्री सय्यद अली हैदर झियादी यांनी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ शेअर करत सय्यद यांनी हा व्हिडिओ भारतातील काश्मीर येथील असल्याचे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ खोटा असल्याचे आता उघड झाले आहे. पाकिस्तानी मंत्र्याने ट्विट केलेला हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वी हरियाणामधील पंचकुला येथे पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचे सदस्य आणि गुरमीत राम रहिमच्या भक्तांवर केलेल्या लाठीचार्जचा असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी मंत्र्याने ट्विट केलेला व्हिडिओचा काश्मीरचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या व्हिडिओंमधील तुकडे एकत्र करुन हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या मंत्र्याने ट्विट केलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातील दिसणारा भाग हा युट्यूबवर ऑगस्ट २०१७ साली अपलोड करण्यात आलेल्या पंचकुला येथील व्हिडिओतील असल्याचे दिसते. यामध्ये बाबा रामरहिम याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याच्या समर्थकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता त्याचे चित्रण दिसत आहे. पुढे याच व्हिडिओमध्ये दोन स्त्रीया लहान मुलींना आपल्या हातात घेऊन बसलेल्या दिसत आहेत. या महिलांच्या तोंडातून रक्त येत असल्याचेही दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ मोहिम सुरु करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सरकार महिलांवर अत्याचार करत असल्याचे सांगत अपप्रचार म्हणून वापरला जात आहे.

ऑगस्ट २०१७ ला अपलोड केलेला व्हिडिओ

या व्हिडिओसंदर्भात अल्ट न्यूजने तपासणी केली. या तसापणीमध्ये पाकिस्तानी मंत्र्याने काश्मीरमधील व्हिडिओ म्हणून शेअर केलेल्या घटनेचा आऊटलूकने दुसऱ्या ठिकाणाहून चित्रित केलेला व्हिडिओ अढळून आला आहे. दोन्ही व्हिडिओमध्ये ० मिनिटे १३ सेंकंदांपासून सारखेच रस्ते दिसत आहेत.

आऊटलूकने चित्रित केलेला व्हिडिओ

मंत्र्याने शेअर केलेल्या व्हिडिओमधील दुसऱ्या भागात दिसत असणाऱ्या महिलांचा व्हिडिओची सत्यता ‘अल्ट न्यूज’ने मे महिन्यामध्येच समोर आणली होती. भारतामध्ये हिंदूंकडून मुसलीमांवर होणारे अत्याचार या मथळ्याखाली पाकिस्तानमध्ये कायमच हा व्हिडिओ व्हायरल केला जातो. हा व्हिडिओ २०१८ सालचा आहे. तेलंगणामधील एका पोलीस उप निरिक्षकाने आपल्या पत्नीला आणि सासुला केलेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ आहे. या संपूर्ण व्हिडिओतील ५६ सेकंदापासूनचा भाग पाकिस्तानमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे.

या सर्व सत्यता पडताळून पाहिल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारत सरकार तसेच काश्मीर परिस्थितीबद्दल अपप्रचार करण्यासाठी मंत्र्यांकडूनही खोटे व्हिडिओ वापरले जात असल्याचे सिद्ध झाले आहे.