संपूर्ण इंग्लंड किंवा न्यूझीलंड संघाने आत्महत्या केली तर पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरीत जागा मिळेल असा तर्क लावणारा पाकिस्तानी चाहता सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी मात केली. या विजयासहीत इंग्लंडने उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे. मात्र इंग्लंडच्या या विजयामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे पाकिस्तान संघाचे स्वप्न जवळजवळ भंग पावले आहे. न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. याच पार्शवभूमीवर पाकिस्तानी चाहते आपल्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी वेगवेगळे सल्ले देताना दिसत आहे. त्यापैकीच हा मजेदार सल्ला सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

शुक्रवारी पाकिस्तानचा बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. मात्र या सामन्यामध्ये पाकिस्तान नाणेफेक हरला आणि बांगलादेशने फलंदाजी घेतली तर पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेबाहेर जाईल. किंवा पाकिस्तानला बांगलादेशला अगदीच मोठ्या पण अशक्य वाटणाऱ्या फरकाने पराभूत करावे लागेल तेव्हाच त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. मात्र सध्या बांगलादेश संघाची कामगिरी पाहता पाकिस्तानचा प्रवास उद्याच्या सामन्यापुरताच असणार आहे हे जवळजवळ निश्चित झाले आहे. असे असेल तरी पाकिस्तानी चाहत्यांनी चाहते आपल्या संघाच्या पाठीशी आहेत. अनेकांनी ट्विटवरुन पाकिस्तानी संघ नक्कीच उपांत्य फेरीत जागा मिळवले अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्विटवरुन अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी संघाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र यापैकी काहींनी अगदी मजेदार पद्धतीने हा पाठिंबा दर्शवला असून आता हे पाकिस्तानी चाहते मस्करीचा विषय ठरत आहेत. अशाच एका चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्याने संपूर्ण इंग्लंड किंवा न्यूझीलंड संघाने आत्महत्या केली तर पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरीत जागा मिळेल असे मजेदार वक्तव्य केले आहे.

‘पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर गेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र असं काहीही झालेलं नाहीय. पाकिस्तानकडे अजूनही संधी आहे. धावसंख्या, गुणतालिका पाहून पाकिस्तानी संघाला शक्कल लडवण्याची गरज आहे. पाकिस्तानला पाहिली संधी ही आहे की, पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करुन ३७० ते ३८० पर्यंत धावसंख्या उभारावी. पाकिस्तानी संघासाठी हे अशक्य नाहीय. नंतर बांगलादेशला फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर त्यांनी फलंदाजी करायला नकार दिला पाहिजे. आम्हाला नाही खेळायचं असं बांगलादेशने सांगायला हवं. ही आपली पहिली संधी असेल’ असं हा चाहता या व्हिडिओमध्ये म्हणतो.

नक्की वाचा >> बांगलादेशविरुद्ध टॉस हरला तरी पाकिस्तान विश्वचषकाबाहेर

या चाहत्याने पुढे दिलेला दुसरा सल्ला आणखीन मजेदार आहे. पुढे हा चाहता म्हणतो, ‘इंग्लंड किंवा न्यझीलंडच्या संघाने आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये आत्महत्या करावी किंवा खेळायला नका द्यावा किंवा त्यांच्या सरकारने त्यांच्यावर बंदी आणावी किंवा त्यांचे संघच संपून जायला हवेत. या दोन शक्यतांमुळेच आपण जिंकू शकतो. प्रार्थना करा. प्रार्थनेमुळे कदाचित आपण उपांत्य फेरीत पोहचू. कोणास ठाऊक हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या दहा लोकांना पाठवल्यावर आपण उपांत्य फेरीत पोहचू शकतो.’

दरम्यान इंटरनेटवर या मजेदार व्हिडिओची चर्चा असली तरी पाकिस्तानी संघाला भारतीय चाहत्यांनीही ट्रोल केले आहे.

नक्की पाहा >> ‘बांगलादेश संघाला कोंडून घ्या किंवा विमान पकडून घरी या’, पाकिस्तानी संघ झाला ट्रोल

भारतामध्ये #PAKvBAN हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. अनेकांनी हा हॅशटॅग वापरून पाकिस्तनी संघाला ट्रोल केले आहे.