आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल” असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेश सरकराच्या या निर्णयानंतर आता मुघलकालीन इतिहासावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याच विषयावर मूळचे पाकिस्तानी असणारे वरिष्ठ पत्रकार आणि लेख तारिक फतेह यांनाही प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या कॅनडामध्ये राहणाऱ्या फतेह यांनी आजतक वृत्तवाहिनीवरील एका चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. याच चर्चेदरम्यान त्यांनी, “जे लोकं भारत लुटण्याच्या उद्देशाने आले होते त्यांना आज आपण बादशाह म्हणून संबोधित करतो. त्यांच्यासंदर्भातील उत्सव साजरे करतो. बाबरचा जन्म भारतातील नाही. त्याचा तर मृत्यूही भारतात झाला नाही. बाबारने भारतामध्ये द्वेष पसरवण्याचे काम केलं. त्याने लाखो लोकांची हत्या केली. आपण त्याला हिंदुस्तानचा बादशाह समजणे चुकीचं आहे,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> देशात ६३ औरंगाबाद… एकूण ७०० हून अधिक ठिकाणांना आहेत मुघलांची नावं

“ताजमहल भारतीयांनी बांधलं आहे. जगामध्ये असा कोणताही देश नाही जो त्यांच्यावर आक्रमण केलेल्या लोकांचा सन्मान करतो. असं केवळ भारतामध्येच होतं. मुघलांनी शिख, हिंदू, मुस्लीम आणि शिया पंथाच्या लोकांवर अत्याचार केले,” असंही फतेह यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच फतेह यांनी दिल्लीतील कुतुब मीनार ही वास्तू २६ जैन मंदिरं उद्वस्त करुन बनवण्यात आल्याचा दावाही केला आहे. त्यामुळेच कुतुब मीनार उभारल्याचा आनंद आपण साजरा करु शकत नाही असंही फतेह यांनी म्हटलं आहे. भारताला आधी सुल्तानांनी उद्धवस्त केलं. येथील लोकांच्या सुल्तान राजवटीमध्ये हत्या करण्यात आला. या उलट भारतीयांनी स्वत:च्या देशात मुगल-ए-आजम सारखा चित्रपट बनवला. मुगल शब्दच दूषित आहे. मुघलांना त्यांच्या मूळ प्रांतामध्ये फारसं काहीच हाती लागलं नाही तर ही तैमूरची पिल्लावळ भारतामध्ये आली आणि त्यांनी भारतामध्ये लुटमार केली, असा दावाही फतेह यांनी केला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी केंद्रीय संस्कृति तसेच पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी कुतुब मीनारसंदर्भात बोलले आहेत. मागील वर्षी त्यांनी कुतुब मीनार आपल्या संस्कृतीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. २७ मंदिरं पाडून ही वास्तू उभारण्यात आली. आजही ही वास्तू जगभरात ओळखली जाते, असं पटेल यांनी कुतुब मीनारमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं.