नोव्हेंबर महिन्यात तमाम तरूणींना आपल्या निळ्या डोळ्यांनी घायाळ केलेला पाकिस्तानी चहावाला आता पुन्हा चर्चेत आलाय. पाकिस्तानमधल्या जिया अली या तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहावाल्याचा फोटो शेअर केल्यानंतर निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला चहावाला बराच लोकप्रिय झाला होता. पर्शिअन लूक असलेल्या या तरुणाने पाकिस्तानी महिलांनाच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर देशातील महिला वर्गालाही वेड लावले होते. अर्शद खान असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या इतवार बाजारात चहा विकायचा. पण आता त्याचं सत्य पाकिस्तानी मीडियाने समोर आणलं आहे, तो मुळचा पाकिस्तानी नाही असा दावा पाकिस्तानच्या अनेक वृत्तवाहिनींनी केला आहे.

वाचा : पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या पेनाची किंमत लाखांच्या घरात?

‘द नॅशनल डाटाबेस अँड रजिस्ट्रेशन ऑथॅरिटीने’ ‘जिओ न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार तो मुळचा पाकिस्तानचा नसून अफगाणिस्तानचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानमध्ये वास्तव्य करण्यासाठी जे आवश्यक दस्तावेज हवेत ते त्याच्याकडे नाहीत तेव्हा तो बेकायदेशीररित्या तिथे राहतो असंही त्यांनी म्हटलं आहे. या वृत्ताला अफगाणिस्तानच्या दूतावातील अधिकारी डॉक्टर ओमर झाकीलवाल यांनी देखील पुष्टी दिलीय. तो पाकिस्तानचा नसून मुळचा अफगाणिस्तानचा आहे असं ट्विट करून त्याने सांगितले आहे. त्याने पाकिस्तानी पासपोर्टसाठीही अर्ज केल्याचं समजत आहे. आपल्या प्रसिद्धीचा गैरवापर करून त्याने खोटे दस्ताऐवज दाखवले असल्याचंही वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी सांगितले आहे. अर्शदचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला मॉडेलिगंच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. चहावाल्यानंतर तो मॉडेल म्हणूनही नावारूपाला आला.

वाचा : धमक्यांना भीक न घालता ‘त्या’ मुस्लिम तरूणाने केला समलैंगिक विवाह