पाकिस्तानमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाकिस्तानी जोडप्याने लग्नामध्ये काहीतरी हटके करण्याच्या नादात असं काही केलं आहे की त्याने प्राणीप्रेमींचा संताप उसळून आला आहे. या पाकिस्तानी जोडप्याने लग्नामध्ये फोटोशूट करण्यासाठी एका सिंहाच्या पिल्लाचा उपयोग सजावटीच्या वस्तूसारखा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फोटोशूटदरम्यान हे सिंहाचं पिल्लू शांत बसावं म्हणून त्याला अंमली पदार्थ देण्यात आले होते. या लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात या जोडप्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्राणी प्रेमी संघटना करत आहेत.

लग्नातील फोटोशूटचे व्हिडीओ या लग्नात फोटोग्राफीसाठी बोलवण्यात आलेल्या अफलज फोटो स्टुडिओच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील जियो टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हे फोटो स्टुडिओ लाहोरमधील एका प्रसिद्ध फोटोग्राफरच्या मालकीचे आहे. सोशल मीडियावर या लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये लग्न झालेलं जोडपं वेगवेगळ्या पोज देत फोटो काढून घेत आहे. तर त्या दोघांच्या मध्ये सिंहांचं पिल्लू जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलं आहे.

ट्विटरवरही या लग्नातील फोटो व्हायरल झाले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या लग्नासारख्या अविस्मरणीय दिवशी कोणी अशाप्रकारे एका मुक्या जनावाराला अंमली पदार्थ देऊन फोटो काढून घेण्याचं काम कसं करु शकतं?, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.

पाकिस्तानमधील प्राणी मित्र संघटना असणाऱ्या सेव्ह द वाइल्डने या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पंजाबमधील वन संरक्षण विभागाकडे या सिंहाच्या पिल्लांचा जीव वाचवण्याची विनंती केली आहे. इतरही अनेक संघटनांनी आपल्या सोशल नेटवर्किंग पेजवरुन या सिंहाच्या पिल्लांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कारवाईची मागणी केली आहे. पाकिस्तानमध्ये जंगली प्राण्यांना पाळण्याची परवानगी देण्यात येते. मात्र त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. परवाना असला तरी या प्राण्यांची काळजी घेण्याचे काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र त्या नियमांमध्येही अशाप्रकारे प्राण्यांना अंमली पदार्थ खाऊ घालणे हे कायद्याचे उल्लंघनच आहे.