वर्तांकन करत असताना पत्रकारांवरील हल्ले हा दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे, त्यातूनच पाकिस्तानच्या एका महिला पत्रकारावर सुरक्षा पोलिसाने केलेल्या हल्ल्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकिकरण आणि नोंदणी विभागाच्या बाहेर वर्तांकन करत असताना एका महिला पत्रकाराला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.
पाकिस्तानमधल्या ‘के २१’ या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने येथल्या राष्ट्रीय सांख्यिकिकरण आणि नोंदणी विभागाच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश केला. येथे येणा-या प्रत्येक नागरिकांना विभागाच्या या कारभारामुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो, तसेच नागरिकांना मिळणारी वागणूक देखील अपमानास्पद असते. याच कारभाराची पोलखल करण्यासाठी ‘के २१’ या वृत्तवाहिनीची महिला पत्रकार सायमा कनवाल गेली होती. मात्र वार्तांकन करताना येथे तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा पोलिसांनी तिला रोखले तसेच त्यांनी कॅमेरा हुसकावून घेण्याच प्रयत्न देखील. कॅमेरामनला शिवीगाळ देखील केली पण आपल्याला हात लावू नये असे सायमा वारंवार बजावत असतानाही एका पोलिसाने कॅमेरा हुसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अरेरावी करणा-या या पोलिसाला सायमा हिने जाब विचारला असता पोलिसांने तिच्या श्रीमुखात भडकावली तसेच तिला मारहाण देखील केली.
हा सर्व प्रकार लाईव्ह सुरु होता. अनेक लोक चालू कार्यक्रम पाहत होते. त्यानंतर वार्तांकनाची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. पाकिस्तानच नाही तर जगभरातील अनेक पत्रकारांनी महिला पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे कॅमेरा सुरु असताना कोणतीही लाज न बाळगता त्यांची अरेरावी सुरू होती. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये या सुरक्षा पोलिसाविरुद्धात तक्रार नोंदवण्यात आली आहे तर दुसरीकडे मात्र सरकारी कामात व्यत्यय आणल्यामुळे या विभागाने चॅनेल आणि पत्रकाराविरुद्ध तक्रार केली आहे. यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानी महिला पत्रकारांवर असे हल्ले करण्यात आले आहेत.