विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धाच्या विजयाची मालिका भारताने रविवारीही कायम राखली. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीनंतर गोलंदाजीत कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी चमक दाखवल्यामुळे भारताने मँचेस्टरमध्ये ‘विजयासप्तमी’ साजरी केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार ८९ धावांनी हरवले. फंलदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व कायम राखत हा विजय मिळवला. मात्र दुसरीकडे पाकिस्तानी संघाची गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे राहिले. रोहित शर्माला धावबाद करण्याची संधी पाकिस्तानी संघाने गमावली. रोहितला दिलेले हे जीवनदान पाकिस्तानला चांगलेच महागात पडले. याशिवाय अनेक ठिकाणी पाकिस्तानी संघाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पहायला मिळाला. यावरुन पाकिस्तानी चाहाते नाराज असून अनेकांनी पाकिस्तानी संघावर टिका केली आहे. अशाच एका पाकिस्तानी चहात्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भारताने पाकिस्तानवर विश्वचषक स्पर्धेमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कायम राखत ‘विजयासप्तमी’ साजरी केली. या विजयानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मँचेस्टरच्या मैदानाबाहेरही जोरदार सेलिब्रेशन झाले. मात्र त्याचवेळी दुसरीकडे पाकिस्तानच्या चाहत्यांना हा पराभव पचवणे जड गेल्याचे मैदानाबाहेरील चाहत्यांशी बोलताना जाणवत होते. अशाच एका चहात्याने पाकिस्तानच्या श्रेत्ररक्षणावर टिका केली आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी संघाची जर्सी घातलेला हा चाहता पाकिस्तान संघावर पंजाबी लहेजा असणाऱ्या हिंदी भाषेत टिका करताना दिसत आहे. टिका करता करता हा चाहता अगदी मध्येच रडू लागल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ‘मला कळलंय की काल रात्री हे लोक (पाकिस्तानी खेळाडू) बर्गर आणि पिझ्झा खात होते. त्यांनी क्रिकेट सोडून कुस्तीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. खेळाडूंचा फिटनेस वगैरे काही मैदानात दिसतच नाही. आम्ही यांच्याकडून एवढ्या अपेक्षा ठेवल्या आहेत आणि हे लोकं बर्गर खात आहेत,’ अशी टिका या चाहत्याने केली आहे. या व्हिडिओमधून पाकिस्तानी चाहत्यांचा राग स्पष्टपणे दिसून येत आहे. बोलता बोलता मध्येच हा चाहता भावूक झाल्याचे या व्हिडिओत दिसते. त्याने डोळ्यावरील गॉगल काढल्यानंतर मागून एकजण पाकिस्तानच्या झेंड्याने त्याचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओबरोबच इतरही अनेक पाकिस्तानी चाहत्यांने ट्विटवरुन ढिसाळ क्षेत्ररक्षणाबद्दल पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवरुन निशाणा साधल्याचे दिसत आहे.