भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून दोन्ही देशांनी चर्चेने प्रश्न सोडवावा असा सल्ला अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानला दिला आहे. असे असतानाच भारत आणि पाकिस्तानमधील अनेक नागरिक सोशल मिडियावरुन युद्ध नको या अर्थाचा #SayNoToWar हॅशटॅग वापरून पोस्ट करताना दिसत आहेत.

#SayNoToWar हा हॅशटॅग वापरून भारत तसेच पाकिस्तानमधील अनेकजण ट्विट करत असून हा हॅशटॅग अनेक दिवसांपासून ट्रेण्डींग हॅशटॅग आहे. युद्ध हे भारत पाकिस्तानमधील समस्येचे उत्तर असू शकत नाही असं या नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. असे असतानाच भारताने युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवावा असे म्हणणारेही अनेकजण सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. असं असताना पाकिस्तानमधील महिलांसाठी काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेने भारतामधील महिलांसाठी एक विशेष शांती संदेश पाठवला आहे.

पाकिस्तानमधील ‘वुमन डेमोक्रॅटीक फ्रण्ट’ या सेवाभावी संस्थेने आपल्या फेसबुक पेजवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील पाकिस्तानी महिला हातामध्ये ‘महिलांकडून सिमेपलीकडील महिलांसाठी’, ‘शांतीसाठी काम करणाऱ्या महिला’, ‘#SayNoToWar’ असे फलक घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय महिलांनाही दोन्ही देशांमधील शांतीसाठी पुढाकार घ्यावा असं मत मांडण्यात आले आहे.

या पोस्टच्या डिस्क्रीप्शनमध्ये ‘अनेकदा पुरुषांनी सुरु केलेल्या युद्धांमध्ये महिला आणि मुलांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो’ असं म्हटलं आहे. पुढे या पोस्टमध्ये #SayNoToWar हा हॅशटॅग वापरला आहे. पोस्टमधील पुढील मजकूर असा, ‘आम्हाला युद्ध नको शांतता हवी आहे. आम्हाला बॉम्ब नको लेखणी हवी आहे. चला सिमेरेषेच्या दोन्ही बाजूकडील लहान मुलांसाठी एक उज्वल भविष्य घडवूयात.’

या संस्थेने आपल्या फेसबुक पेजवर अनेक फोटो शेअर करुन युद्धाऐवजी शांततेच्या मार्गानेच दोन्ही देशांमधील प्रश्न सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.