इंग्लंडमधील एका प्राणीसंग्रहालयामध्ये अगदीच मजेदार घटना घडली आहे. येथील लिंकनशायर वाइल्डलाइफ पार्कमधील आफ्रीकन ग्रे पॅरोट्स प्रकारच्या पोपटांना पर्यटकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा निर्णय प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनाने घेतला आहे. लिंकनशायर लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार या पोपटांनी एकमेकांना अपशब्द शिकवले आणि ते पर्यटक समोर आल्यानंतर या अपशब्दांचा उच्चार करायचे आणि जोरात हसायचे. त्यामुळेच प्राणीसंग्रहालयाने त्यांना पर्यटकांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पोपट पार्कमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाले, असं पार्कचे प्रमुख कार्यकारी अधिकारी स्टीव्ह निकोल्स सांगतात.

सुरुवातील हे पोपट संग्रहालयातील कर्मचाऱ्यांसमोर अपशब्द बोलले तेव्हा सर्वांनाच खूप हसू आलं. हेच पाहून या पक्षांनी असं बोलणं सुरुच ठेवलं असं निकोल्स सांगतात. त्यानंतर हे पोपट अनेकदा अपशब्द वापरु लागले आणि जोरजोरात आवाज करुन गोंधळ घालू लागले. अशाप्रकारे पोपटांनी अपशब्द शिकणे आणि त्यांचा वापर करणे यासारखे प्रकार आधीही घडलेत. अनेक पर्यटकांना पोपटांच्या तोंडून अशी मजेदार भाषा ऐकायला आवडते. मात्र लिंकनशायरमधील हे पाच पोपट अपशब्द वापरल्यानंतर एकमेकांच्या वक्तव्यांवर जोरजोरात आवाज करुन दाद द्यायचे. “हे चौघे-पाच जण एकत्र असले आणि एखाद्याने अपशब्द उच्चारला की सगळेच  हसण्याचा आवाज करुन दाद देतात. तुम्हाला काही कळण्याआधीच हा सारा प्रकार एखाद्या लाफिंग क्लबसारखा झालेला असतो. अपशब्द आणि त्याला दाद देणं असा हा त्यांचा स्वत:चाचा वेगळा कार्यक्रम रंगतो,” असं निकोल्स म्हणाले.

करोना लॉकडाउननंतर हे पार्क पर्यटकांसाठी सुरु झाल्यानंतर या पोपटांनी थेट पर्यटकांसाठीच अपशब्द वापरुन्यास सुरुवात केली. हे पोपट अपशब्दांबरोबरच पर्यटकांना त्यांच्या नावाने हाक मारायचे. हे पाहून अनेकांना मज्जा वाटायची. मात्र पार्कचे नाव बदनाम होऊ नये म्हणून व्यवस्थापनाने या पोपटांची भाषा सुधारत नाही तोपर्यंत त्यांना पर्यटकांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी आम्ही त्यांना पर्यटकांपासून दूर ठेवलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडेल. त्यांनी एकत्र मिळून गोंधळ घालण्याचे प्रकार कमी झाल्यानंतर त्यांना पुन्हा पर्यटकांसमोर आणले जाईल असं पार्क व्यवस्थापनाने म्हटलं आहे.