तापमान वाढ आणि प्रदुषण या दोन समस्यांमुळे मानवाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असली तरी प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे. अगदी डोंगरांपासून ते समुद्रांपर्यंत सर्वच ठिकाणे मानवाने प्रदुषीत केली असून त्यामुळे वेगवेगळ्या प्रजातींचा अधिवास धोक्यात आला आहे. मानवाने केलेल्या प्रदुषणाचे दुष्परिणाम प्राण्यांना भोगावे लागत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

ऑस्ट्रेलियामधील सेंट क्लिडा पेंग्विन या पेंग्विन संवर्धनासाठी काम करणाऱ्या गटाने फेसबुकवर एका मृत पेंग्विनचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोतील पेंग्विनच्या पायामध्ये पार्टीसाठी वापरले जाणारे फुटलेल्या फुग्यांचे आणि रिबिन्सचे तुकडे अडकलेले दिसले. मॉर्निंगटन द्वीपकल्पावरील डोरमाना पियर (पुळण) येथे जोसी जोन्स या स्थानिक महिलेने हा फोटो काढला आहे. किनाऱ्यावर कचरा वेचत असताना जोसीला हा मृत पेंग्विन अढळला.

‘अशाप्रकारे पायांमध्ये गोष्टी अडकल्यास पेंग्विन्सच्या पोहण्याच्या क्षमतेवर मर्यादा येते. त्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास अडचणी येतात आणि त्यांची उपासमार होते. तसेच पाय अडकल्यास ते पाण्यामध्ये बुडतात. फुग्यांमुळे आणि रिबिन्समुळेच याच पेग्विंनचा मृत्यू झाला. कोणाच्या तरी मालकीचे हे फुगे होते जे त्यांनी समुद्रात फेकले. खरचं हे फुगे पेंग्विनच्या जीवा इतके मौल्यवान आहेत का?’ असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लोकांना फुगे वापरु नका असे आवाहन केले आहे.

सेंट क्लिडा येथील अर्थकेअर येथे संशोधन करणाऱ्या अभ्यासक फ्लॉसी स्पेरिंग यांनी याहू न्यूज ऑस्ट्रेलियाशी बोलताना फुग्यांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. ‘लोकांना वाटतं त्यापेक्षा फुग्यांचा जास्त वाईट परिणाम पर्यावरणावर होतो. समुद्रातील पक्षांसाठी फुगे हे खूप घातक आहेत. हे फुगे पक्षांच्या पायाला अडकतात आणि मग त्यामुळे पक्षांची हलचाल मंदावल्याने कालांतराने त्यांचा मृत्यू होतो’, असं फ्लॉसी सांगतात. पेंग्विनप्रमाणेच सील मासेही या फुग्यांमध्ये अडकून बुडू शकतात. तर समुद्री कासवांच्या पोटामध्ये फुग्याच्या रबराचे तुकडे अढळतात असही फ्लॉसी म्हणाल्या.

फुग्यासाठी वापरला जाणारा रबर पाण्यात विरघळत नाही त्यामुळे त्याचे कधीच विघटन होत नाही. याच कारणामुळे हे रबर समुद्रातील जीवसृष्टीसाठी घातक ठरते. ‘रबराचे धोके खूप आहेत. त्यामुळेच पुढील वेळेस कोणत्याही कार्यक्रमासाठी फुगे फुगवण्याआधी समुद्रातील प्राण्यांचा विचार करा. फुग्यांऐवजी पर्यावरण पुरक पर्याय निवडा’, असं आवाहन फ्लॉसी यांनी केले आहे.

प्रदुषणाचा होणारा परिणाम दाखवणारा आणखीन एक फोटो काही दिवसांपुर्वी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याच्या ढिगामध्ये हत्ती गवत शोधत असताना दिसत आहे.

त्या आधी काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियाच्या राष्ट्रीय अभयारण्याच्या किनाऱ्यावर एका व्हेल माश्याचा मृतदेह वाहून आला होता. या माशाच्या पोटामध्ये जवळजवळ सहा किलो प्लास्टिकचा कचरा सापडला होता असं अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.