अमेरिकेमध्ये अनेकदा विमानात प्रवासी आपल्या पाळीव कुत्र्यांना आणि मांजरींना स्वत:बरोबर घेऊन जाताना दिसतात. मात्र नुकतचं एका महिला प्रवाशाने चक्क एक छोटा घोडा घेऊन विमानाने प्रवास केला. छोट्या घोड्याचे विमानातील फोटो इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहेत.

अमेरिकेतील शिकागो येथून नेबरास्काला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानातून चक्क एका छोट्या घोड्याने प्रवास केला. या विमानमध्ये छोटा घोडा पाहिल्यानंतर अनेक प्रवाशांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. या छोट्या घोड्याने विमानतळ परिसरामध्ये प्रवेश केल्यापासूनच अनेकांनी त्याचे व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.

मागील आठवड्यामध्येच अमेरिकेतील वाहतूक विभागाने कुत्रे आणि मांजरींप्रमाणे छोट्या घोड्यांनाही विमानातून प्रवासी घेऊन जाऊ शकतात असं स्पष्ट केलं होतं. असे असले तरी प्रावाशांबरोबर पाळीव प्राण्यांना विमानात प्रवेश द्यायचा की नाही याचे संपूर्ण अधिकार विमान कंपनीकडे आहेत. अमेरिकन एअरलाइन्समध्ये कुत्री, मांजरी आणि छोटे घोडे घेऊन जाण्यास परवाणगी आहे. ‘हा छोटा घोडा प्रशिक्षित घोडा होता. असे पाळीव प्राणी अमेरिकेमध्ये विमानात घेऊन जाता येतात,’ असं अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी ‘द इंडिपेंडट’शी बोलताना सांगितले.

अमेरिकेमध्ये पाळीव प्राण्यांना भावनिक आधार (इमोशनल सपोर्ट) म्हणून अनेक ठिकाणी त्यांच्या मालकांबरोबर प्रवेश देण्यात येतो. ‘पाळीव प्राण्यांचे त्यांच्या मालकांच्या आयुष्यात असणारे महत्व आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळेच आम्ही अतिरिक्त पैसे न आकारता अशा प्राण्यांना विमानामधून घेऊन जाण्याची सोय पुरवतो,’ असंही अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.