सध्या ‘पावरी’ हा शब्द जवळपास प्रत्येकाच्याच तोंडावर आहे. हा शब्द चर्चेत आला तो एका १९ वर्षीय पाकिस्तानी तरुणीमुळे. दनानीर मोबीन (Dananeer Mobeen) ही सध्या पावरी गर्ल नावाने जगभरात प्रसिद्ध झालीये.

फेब्रुवारी महिन्यात 19 वर्षांच्या दनानीर मुबीनचा एक पाच सेकंदाचा व्हिडिओ समोर आला होता, यात ती पार्टी करत असल्याचं सांगत होती. पण, ‘पार्टी’ बोलताना मुद्दाम ती ‘पावरी’ असा उच्चार करते. दक्षिण आशियातील लोकं जे पाश्चिमात्य देशातील उच्चारण स्वीकारतात त्यांची खिल्ली उडवण्यासाठी ती पार्टीऐवजी पावरी बोलते. ‘ये हमारी कार है, ये हम हैं और ये हमारी पार्टी हो रही है’ असं म्हणतानाचा तिचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर झाला. भारतातही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाइक व शेअर केला जात असून यावरुन अनेक मीम देखील व्हायरल झालेत. “या व्हिडिओनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा वाढेल आणि दोन्ही देश एकमेकांच्या जवळ येतील”, अशी अपेक्षा दनानीर मोबीनने एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. तसेच, सीमेपलीकडून मिळालेल्या प्रेमासाठी तिने भारतीयांचेही आभार मानलेत.

“तो व्हिडिओ अगदी सहज शूट केला होता, आणि सुरूवातीला तो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याचाही माझा हेतू नव्हता” असं दनानीर मुबीनने सांगितलं. तसेच, “सीमेपलीकडून मिळालेल्या प्रेमाबाबत कृतज्ञ आहे” असंही ती आनंदाने म्हणाली. शिवाय व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून अभिनयासाठी, मॉडेलिंगसाठी आणि जाहिरातींसाठी अनेक ऑफर येत आहेत, पण पाकिस्तान फॉरेन सर्व्हिसमध्ये काम करण्याचं इच्छा असल्याचं मुबीनने सांगितलं.


उत्तर पाकिस्तानातील नाथियागली पर्वतांमध्ये दनानीर मुबीनने हा व्हिडिओ शूट केला होता. यात तरुणांचा एक गट रस्त्याच्या कडेला मजा करताना दिसत असून त्यांच्यावर कॅमेरा फिरवत ‘ये हमारी कार है, ये हम हैं और ये हमारी पार्टी हो रही है’ असं म्हणताना दनानीर मुबीन दिसतेय. इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड धुमाकूळ घालतोय.