ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सर्वाधिक वापरलं जाणारं ई-वॉलेट म्हणजे पेटीएम. मात्र, पैशांच्या व्यवहारांसाठी हे अॅप जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुमच्या स्मार्टफोनमधील काही ठराविक अॅप्स तुम्हाला डिलीट करावी लागणार आहेत. पेटीएमनं सुरक्षित व्यवहाराच्या दृष्टीनं हे नवं धोरण आखलं आहे.

काही मोबाईल अॅप्स ग्राहकांची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेतात. त्यामध्ये पेटीएमचाही समावेश आहे. पेटीएमने आपल्या सुरक्षा धोरणानुसार काही अॅप्स ब्लॉक केली आहेत, जी ग्राहकांच्या ऑनलाईन व्यवहारांसाठी धोकादायक आहेत. याचा अर्थ जर अशी ब्लॉक केलेली अॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल असतील तर तुमच्या मोबाईलमधील पेटीएमचं अॅप चालणार नाही.

टाइम्सनाऊच्या वृत्तानुसार, जर युजर्सच्या मोबाईलमध्ये ‘रिमोट कन्ट्रोल’ अॅप इन्स्टॉल असेल आणि तुम्ही पेटीएम वापरण्याचा प्रयत्न करीत असाल तर पेटीएम अॅपच्या होमपेजवर तुम्हाला एक पॉपअप येईल. त्यामध्ये असे लिहिलेलं असेल की, “तुमच्या फोनमधील हे अॅप आधी डिलीट करायला हवं.” जोपर्यंत तुम्ही ब्लॉक केलेली ही अॅप्स डिलीट करीत नाही तोपर्यंत तुम्हाला पेटीएम वापरता येणार नाही. पेटीएम अॅपच्या होमपेजवरील ते पॉपअपही जाणार नाही.

दरम्यान, या अडचणीचा सामना कराव्या लागलेल्या अनेक युजर्सनी ट्विटरच्या माध्यमांतून पेटीएमकडे याबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. यामध्ये पेटीएमने या टोकाच्या सिक्युरिटी फिचर्सबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले होते. मात्र, पेटीएमने ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी उचलण्यात आलेलं पाऊल असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.