लॉटरीचं तिकीट लागणं आणि त्यामध्ये भरपूर रकमेचं बक्षीस जिंकणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड मध्ये एका महिलेला आपल्या नवऱ्याच्या वाढदिवशीच लॉटरीचं तिकीट लागलं आहे. या महिलेने ५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २.६ कोटींच्या घरात) ३० मे रोजी या महिलेच्या पतीचा वाढदिवस होता, आपल्या पतीला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी महिलेने जवळील दुकानामधून लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख १० भागांमधून निवडण्यात आलेल्या विजेत्यांमध्ये या महिलेचा नंबर लागला आहे.

“लॉटरी लागल्याची बातमी कळताच आम्ही तात्काळ दुकानात जाऊन खातरजमा करुन घेतली. त्यांनी एकदा नाही तीनदा तिकीट तपासलं आणि हो आम्हालाच ती लॉटरी लागली होती. माझा त्या क्षणी माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. माझं अंग अक्षरशः थरथरत होतं. माझ्या नवऱ्याच्या वाढदिवसासाठी मी हे लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, आणि आतापर्यंत मी त्याला दिलेली ही सर्वोत्तम भेट ठरली आहे.” या महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या महिलेने आपली ओळख न जाहीर करण्याची विनंती केली आहे. गेले काही दिवस मी आणि माझा परिवार खूप खडतर परिस्थितीमधून जात आहे. मी आणि माझा पती आम्ही दोघेही आता निवृत्त झालेलो आहोत, त्यामुळे या पैशांचं काय करायचं हे आम्ही आरामात बसून ठरवु असं महिलेने सांगितलं.