“ऐ दोस्ती हम नहीं तोडेंगे,तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडगे” मैत्रीच्या दुनियेतील हे गाणं फक्त ऐकण्यापुरते न ठेवता सांगलीतील काही मित्रांनी सत्यात उतरवले आहे. मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्यावर असलेलं तब्बल १४ लाख रूपयांचं कर्ज मित्रांनी मिळून वर्षश्राद्धाच्या दिवशी फेडत श्रद्धांजली वाहिली. मिरजमधील बेळंकी येथे मैत्रीच्या दुनियेला सलाम करणारी ही घटना घडली आहे. राजू सातपुते असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

राजू सातपुते यांच वयाच्या ३२ व्या वर्षी २९ मे २०१८ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते सलगरे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. राजू यांच्या जाण्यानं सातपुते कुटुंबासह सर्वांना मोठा धक्का बसला होता. राजुच्या मागे पत्नी ,दोन चिमुकल्या मुली आणि आई वडील असा,संसार, त्याच्या या निधनानंतर तो उघड्यावर पडला. राजू यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्यामुळे गावात सगळ्यांच्या परिचयाचे होते.

राजू यांनी घर बांधणीसाठी १३ लाख ६८ हजार रुपयांचे कर्ज काढले होते. राजू यांच्या जाण्यानं सातपुते कुटुंबापुढे कर्जाचा बोजा पडला होता. रक्षा विसर्जनाच्या दिवशी राजू यांच्या मित्रांना ही बाब लक्षात आली. मैत्रीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कुटूंबावर येऊन पडलेले कर्जाचे डोंगर दुरु करण्याचे त्यांनी ठरवले. इतकेच नव्हे तर राजू यांचे वर्षश्राद्ध हे कर्ज फेडून मगच श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्धार त्यांनी केला. आणि १ जून २०१८ पासून राजुचे शिक्षक मित्रांनी पुढाकार घेत मदत निधी गोळा केला. अखेर २९ मे २०१९ रोजी राजू यांच्या कुटुंबावर असलेले १४ लाखांचे कर्ज फेडून मित्रांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.