कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा आणि विश्वासू प्राणी मानला जातो. याच पाळीव कुत्र्यांमुळे अमरेलीमधील मेंढपाळाचा जीव वाचला आहे. मेढ्यांना चरायला माळरानात घेऊन गेलेल्या भावेश भारवाड या २५ वर्षीय तरुणावर सिंहानं हल्ला केला. मात्र सुदैवानं कुत्र्यामुळे त्याचे प्राण वाचले.

भावेश मेंढ्यांच्या कळपाला घेऊन रानात गेला होता. मात्र अचानक तीन सिंहानं त्याच्या कळपावर हल्ला केला. सिंहानं भावेशच्या तीन मेंढ्यांना ठार केलं. कळपाला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या भावेशवरही सिंहांनी हल्ला चढवला. मात्र त्याच्या पाळीव कुत्र्यानं भुंकून सिंहाना भावेशपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून गावकरी मदतीला धावत आले.

माणसांना पाहून सिंहांनी जंगलात धूम ठोकली. सिंहाच्या हल्ल्यात भावेश किरकोळी जखमी झाला असून रुग्णालयात उपचार घेत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सिंहाचा वावर वाढला आहे.