२०१९ हे वर्ष महिला अ‍ॅथलिटसाठी खास ठरलं आहे. या वर्षी क्रिडाविश्वामध्ये महिलांचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं. भारतीय महिला खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मात्र हे यश संपादन करण्यासाठी प्रत्येक अ‍ॅथलिट प्रचंड मेहनत घेतली आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येऊ शकते. हेच सिद्ध करणारं उदाहरण म्हणजे फिलिपीन्समधील ११ वर्षाची मुलगी.

फिलिपीन्समध्ये एका शाळेमध्ये धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत शाळेतील अनेक मुलांनी सहभाग घेतला होता. साऱ्याच लहान मुलांनी स्पर्धेची पूर्ण तयारी केली होती. मात्र या सगळ्यांमध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधलं ते ११ वर्षाच्या रिया बुलोस या मुलीने. शूज नसल्यामुळे पायाला बँडेज बांधून रिया स्पर्धेत धावली. इतकंच नाही तर तिने जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धकांना पराभूत करत तीन सुवर्ण पदक जिंकले. सध्या या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


रियाकडे स्पर्धेत धावण्यासाठी बूट नव्हते. त्यामुळे धावत असताना पायाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी तिने पायाच्या टाचेवर आणि बोटांना बँडेज बांधलं होतं. विशेष म्हणजे जिंकण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर तिने ही स्पर्धा जिंकली. तिने ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटर या तीन स्पर्धांमध्ये विजय होऊन सुवर्णपदक पटकावले. रिया विजयी झाल्यानंतर तिच्या प्रशिक्षकांनी तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

दरम्यान, या मुलीचा फोटो शेअर झाल्यानंतर अनेकांनी ‘नाइकी’ या ब्रॅण्डला अशा गरजू लहान मुलांना मदत करण्याचं आवाहन केलं. तसंच एका युजरने या चिमुकलीशी संपर्क साधून दिला मदत करण्याचा प्रयत्न केला.