आपल्या इवल्याशा शेपटीत कान साफ करण्याचा बड पकडून एक छोटासा समुद्री-अश्व पाण्यात फिरत आहे. या अप्रतिम फोटोनं अवघ्या विश्वाचं लक्ष वेधलंय. कदाचित अनेकांना हा फोटो पाहून मोठी गंमतच वाटली असेल. हा फोटो पाहून ‘किती क्यूट सी-हॉर्स आहे हा!…’ असेही अनेक जण म्हणाले असतील.

कॅलिफोर्नियातील जस्टीन हॉफमन या फोटोग्राफरनं हा फोटो काढला आहे. या फोटोसाठी जस्टीनला ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर’चं नामांकन मिळालं आहे. वाऱ्याच्या वेगानं जस्टीनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कदाचित हा फोटो जस्टीनला ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर’चा किताबही मिळवून देईल, पण फोटोमागची भीषणता मात्र तो आणि इतर कोणीही नाकारू शकत नाही. फक्त हा किताब जिंकण्यासाठी जस्टीनने तो फोटो काढला नव्हता. त्यामागचं सत्य त्याला जगासमोर आणायचं होतं. इंडोनेशियातल्या समुद्रात जस्टीननं हा फोटो टिपला आहे. हा फोटो अप्रतिम नसून तो खूपच विचलित करणारा आहे, असं त्यानं एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं.

वाचा : सेल्फीच्या कॉपीराईट्सची माकडाची लढाई संपली; फोटोग्राफरकडून मिळणार २५% रक्कम

जस्टीन आपल्या मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेला होता. तेव्हा एका मित्राने शेपटीत बड वाहून नेणारा समुद्री-अश्व त्याला दाखवला. त्याने समुद्रात दूरदूरपर्यंत पाहिलं, तेव्हा फक्त कचराच दिसत होता. कुठे प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या होत्या. भरतीच्या वेळी तर हा सगळा कचरा किनाऱ्यावर आला. ‘समुद्रातील डेब्रिजमुळे हा छोटा जीव त्यात गुडूप झाला. पण काही वेळाने त्यातून मार्ग काढत शेपटीत बड पकडून तो बाहेर आला. जणू या परिस्थितीशी त्याने जुळवूनच घेतले होते. इंडोनेशियातल्या समुद्रात जैवविविधता मोठ्या प्रमाणत आढळते, पण त्या दिवशी मात्र मला कचरा सांडपाणी, प्रदूषण हेच दिसलं. या दूषित पाण्यात हा छोटासा जीव जगण्यासाठी संघर्ष करत होता. हे दृश्यच विचलित करणारं होतं. जर हे असंच सुरू राहिलं तर २०५० पर्यंत समुद्रात माशांऐवजी कचराच सर्वाधिक दिसेल. तेव्हा हे सगळं थांबवण्याची वेळ आता आलीय, अशी कळकळीची विनंती त्याने केलीय.

वाचा : जगातील सर्वात वृद्ध पांडाचा चीनमध्ये मृत्यू