जगातील सर्वात मोठा प्राणी म्हणजेच ब्लू व्हेल माश्याबद्दल मानवाला कायमच कुतूहल राहिलं आहे. सामान्यपणे हा मासा खूप क्वचित प्रसंगी पाहायला मिळतो. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये आजही अनेक संशोधक ब्लू व्हेलसंदर्भातील संशोधन करत असून या माश्याबद्दलची नवीन माहिती वेळोवेळी समोर येत असते. या माशाचा अभ्यास करण्यासाठी अनेकदा वैज्ञानिक खोल समुद्रामध्येही जातात. मात्र सर्वांनाच हा मासा पाहायला मिळत नाही. मात्र ऑस्ट्रेलियातील सिडनीजवळ एका फोटोग्राफरला समुद्रात न जाताच हा जगातील सर्वात मोठा मासा पाहायला मिळाला आणि या फोटोग्राफरने काढलेला फोटो आता व्हायरल झाला आहे.

सिडनीमध्ये काम करणारा फोटोग्राफर सियान हा सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ एरियल फोटोग्राफी करत हंपबॅक व्हेलचे फोटो काढत होता. त्याचवेळी त्याच्या कॅमेरामध्ये ब्लू व्हेलचा फोटो क्लिक झाला. या ब्लू व्हेलची लांबी ८२ फूट आणि वजन जवळजवळ १ लाख किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे ब्लू व्हेलचा फोटो काढण्याची ही काही पहिली वेळ नाही. मात्र मागील १०० वर्षांमध्ये अशाप्रकारे सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच फ्रेममध्ये संपूर्ण ब्लू व्हेल दिसणारा फोटो काढण्याची ही तिसरीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो सध्या ऑस्ट्रेलियाबरोबरच जगभरातील प्राणी प्रेमींच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सियानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. “मी नक्की कुठून ही गोष्ट सांगायला सुरु करु मला कळत नाहीय. माझ्या डोक्यात सध्या लाखो विचार आहेत. जर या व्हेलबद्दल बोलायचे झाल्यास तिची लांबी ३० मीटरपर्यंत आहे. या व्हेलच्या जीभेचे वजन एखाद्या हत्ती एवढे असू शकते. या व्हेलचं हृदयही एखाद्या छोट्या गाडीच्या आकाराचे असू शकते. मला अपेक्षा आहे की हा फोटो पाहून तुम्हालाही माझ्याप्रमाणे आनंद झाला असेल. मला खरोखरच जॅकपॉट लागला आहे,” अशी कॅप्शन सियानने या फोटोला दिली आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियातील एनएसडब्ल्यू नॅशनल पार्क अ‍ॅण्ड वाइल्डलाइफ सर्व्हिसने एक पत्रकच जारी केलं आहे. या पत्रकानुसार आकारावरुन या व्हेल माश्याचे वजन १०० टन असण्याची शक्यता आहे.