केरळची साक्षरता ही भारतातील अनेक राज्यांपेक्षा अधिक आहे. पण असे असताना इथल्या परिस्थितीशी विसंगत असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्थानिक डॉक्टरांनी महिलांचा एक वर्ग भरवला होता पण तिथे त्यांनी जे पाहिले त्यामुळे त्यांना धक्काच बसला. लसीकरणावर व्याख्यान देण्यासाठी इथल्या धार्मिक केंद्रात डॉक्टर आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलाही जमल्या होत्या. परंतु डॉक्टर आणि महिलांच्यामध्ये पडदा लावण्यात आला. धार्मिक कारण सांगत हा पडदा लावण्यात आला होता. याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर टिकाही होत आहे.

वाचा : जाणून घ्या कांद्याच्या चकत्या घराच्या कोप-यात ठेवण्याचे फायदे

केरळातल्या निलेश्वर तालुका रुग्णालयातले डॉ. जमाल अहमद हे लसिकरणावर जनजागृती करण्यासाठी निलेश्वरमच्या एका धार्मिक केंद्रावर आले होते. त्यांच्या व्याख्यानाला आजूबाजूच्या परिसरातील १०० मुस्लिम महिला आल्या होत्या. पण डॉक्टर आणि महिलांमध्ये एक मोठा पडदा लावण्यात आला. हा पडदा बाजूला करण्याची विनंती त्यांनी केली पण त्यांच्या सूचनेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही त्यामुळे नाईलाजाने त्यांनी पडद्याच्या आडूनच महिलांना लसीकरणाचे महत्त्व समजून सांगितले. आपण जगजागृती करण्यासाठी येथे आलो आहोत त्यामुळे त्याला प्राधान्य दिले पाहिजे असे समजून त्यांनी हे व्याख्यान पार पाडले असेही द न्यूज मिनीटच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

वाचा : अखेर सॅमसंगने जाहिर केले ‘सॅमसंग गॅलेक्सी नोट ७’ च्या स्फोटामागचे कारण