देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये ३१ जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशामध्येही थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. २५ मार्च पासून सुरु असणारा लॉकडाउन तीन महिन्यांनंतरही सुरुच राहणार आहे. देशातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन महत्वाचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील अफवांचे प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे.

अशीच एक अफवा मागील काही दिवसांपासून व्हायरल झाली आहे. या व्हायरल मेसेजमध्ये सरकराने प्रत्येक नागरिकाला दोन हजार रुपयांची मदत देण्याची योजना मंजूर केल्याचा दावा केला जात आहे. “अखेर सरकराने प्रत्येक नागरिकाला मदतनिधी म्हणून २००० रुपये देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबाजवणी सुरु झाली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही यासाठी अर्ज करु शकता. मी ही आताच हे केलं आहे. तुम्हाला एकदाच अर्ज करता येईल. लवकर करा मर्यादित आहे निधी,” असं या व्हायरल मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या मेसेजबरोबर ‘india-relief’ अशा नावाने एक शॉर्ट लिंकही फिरवली जात आहे. मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा अशल्याचा खुलासा पीआयबीने केला आहे.

व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. पीआयबीच्या महाराष्ट्रामधील अकाउंटवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये व्हायरल होणाऱ्या मेसेजचा स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आला आहे. “व्हॉट्सअप वरील एका संदेशामध्ये असा दावा करण्यात आला आहे की सरकारने प्रत्येक नागरिकाला दोन हजार रुपयांची मदत देण्याची योजना मंजूर करुन निधी वाटप सुरू केले आहे. मात्र या मेसेजमध्ये देण्यात आलेली लिंक खोटी आहे. अशा प्रकारची खोटी संकेतस्थळे आणि व्हॉट्सअप मेसेज पासून सावध राहा,” असं पीआयबी महाराष्ट्रने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपासून अशाप्रकारे अनेक मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अशा मेसेजची सत्यता पडताळूनच ते फॉरवर्ड करावेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने दिला आहे. अशा बनावट मेसेजपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी ट्विटवरवरुन दिला आहे. सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.