सोशल मिडीयावर सध्या एका नवजात बाळाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जन्माला आल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये हे बाळ डॉक्टरांच्या तोंडावरील सर्जिकल मास्क खेचताना दिसत आहे. हा फोटो खूपच आशादायी असल्याचे मत अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर व्यक्त केलं आहे. अनेकांनी हा फोटो म्हणजे लवकरच आपल्याला मास्क न घालता फिरावं लागेल असं शुभचिन्ह असल्याचं मतही व्यक्त केलं आहे. करोनाच्या साथीमुळे मास्क घालूनच सध्या लोकांना घराबाहेर पडावं लागत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे अत्यंत महत्वाचे असून सध्याच्या परिस्थितीमध्ये हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय.

हा फोटो युएईमधील गायनॅकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. सामीर चेईब यांनी शेअर केला आहे. बाळाला गर्भशयामधून बाहेर काढल्यानंतर त्याने डॉक्टरांचे मास्क पकडलं आणि ते खेचू लागलं. यामुळे डॉक्टरांनाही हसू आवरता आलं नाही. “आपल्या सर्वांनाच आपण लवकरच मास्क काढू यासंदर्भातील संकेत हवे आहेत,” अशी कॅप्शन देत डॉक्टरांनी हा फोटो शेअर केलाय.

डॉ. सामीर यांनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर तो वेगवेगळ्या अकाऊंटवरुन अनेकांनी शेअर केला आहे. या फोटोला अनेकांनी हा वर्षातील सर्वोत्तम फोटो असल्याचे म्हटलं आहे. “काय सुंदर आणि अर्थपूर्ण फोटो आहे. लहान बाळाला आधीपासून काय योग्य आहे हे टाऊक आहे, आपण जगायला शिकलं पाहिजे,” असं एका युझरने कमेंट करुन म्हटलं आहे.

“मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात भावनिक फोटो आहे,” असं अन्य एकाने म्हटलं आहे. प्रत्येकाची अशीच अपेक्षा असल्याची कमेंटही एका युझरने केली आहे. हा मी पाहिलेला सर्वात सुंदर फोटो आहे. अपेक्षा आहे की लवकरच आपल्याला या मास्कपासून सुटका मिळेल, असंही एका युझरने या फोटोवर कमेंट करताना म्हटलं आहे. अनेकांनी एवढा सुंदर फोटो शेअर केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले आहेत. फेसबुकवरही या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला असून हे बाळ आपल्याला काहीतरी शुभ संकेत देऊ इच्छित असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.