जगात वाऱ्याच्या वेगानं पसरणाऱ्या ‘फेक न्यूज’ म्हणजेच खोट्या बातम्या आता सगळ्यांचीच डोकेदुखी बनल्या आहेत. या फेक न्यूजची व्याप्ती इतकी की या शब्दाचा समावेशदेखील शब्द कोशात करुन घ्यावा लागला. एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता अशा अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. याचमुळे भारतातही अनेकांचे जीव गेले. आता असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटो एका विचित्र दिसणाऱ्या डुकराच्या पिल्लाचे आहेत. एका डुकरानं मानवी शरिराप्रमाणे रचना असलेल्या पिलाला जन्म दिल्याच्या भाकड कथा सोशल मीडियावर महिनाभरापासून वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहेत. या फोटोंची आणि त्यामागे गुंफलेल्या कथांची पडताळी न करता अनेकांनी हे फोटो सोशल मीडियावर सर्रास फॉरवर्ड केले.

काहींनी हे फोटो भारतातले आहेत असंही सांगितलं. मात्र सोशल मीडियावर हे फोटो केनिया, ब्राझील अशा वेगवेगळ्या देशांतले असल्याचं सांगत व्हायरल करण्यात आले. मात्र हे सर्व खोटं असून या फोटोंमागचं सत्य अवाक् करणारं आहे. एका इटालियन कलाकारानं हे माणसांसारखं दिसणारं डुकराचं पिल्लू तयार केलं आहे. Laira Maganuco असं या कलाकाराचं नाव आहे. लायरानं सिलिकॉन रबर वापरून ही कलाकृती तयार केली. दिसायला अगदी खरीखुरी वाटणारी ही शिल्पकृती तिनं विक्रीसाठी ठेवली आहे. अगदी जिवंत वाटणाऱ्या सिलिकॉन आणि रबरपासून तयार केल्या जाणाऱ्या शिल्पकृतींना खूपच मागणी आहे.

मात्र लायराच्या या शिल्पकृतीच्या फोटोंशी छेडछाड करत ते केवळ भीती पसरवण्यासाठी व्हायरल करण्यात आले. याआधीदेखील लायराच्या कलाकृतींच्या फोटोंशी छेडछाड करत ते व्हायरल करण्यात आले होते.