विमानप्रवास म्हटल्यावर विमानाचे उड्डाण (टेकऑफ) आणि विमान पुन्हा जमिनीवर उतरणे (लॅडिंग) या दोन्ही गोष्टींना सर्वाधिक महत्व असते. अनेकदा प्रवाश्यांना या दोन्हीवेळीस सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. ज्याप्रमाणे प्रवाशांना या टेकऑफ आणि लॅडिंगचे टेन्शन असते तसेच वैमानिकांनाही असते. कधीतरी विमानाचे लॅण्डिंग करताना हवामान खराब असल्यास वैमानिकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. काहीं वैमानिकांना अनेक प्रयत्न नंतरही विमान उतरवणे शक्य होत नाही तर काहीजण आपले सर्व कौशल्य पणाला लावून यशस्वीरित्या विमान खराब हवामानातही धावपट्टीवर उतरवतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

इंग्लंडमधील ब्रिस्टोल विमानतळावरील हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ६० किलोमीटर प्रती तासाहून अधिक वेगाने वारे वाहत असताना केलेले हे लॅडिंग सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाले आहे. इंग्लंडमधील काही भागाला कॅलम वादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे जोरदार वाऱ्यांबरोबरच संततधार पावसामुळे विमानतळावरील धावपट्टी निसरडी झाली होती. अशा परिस्थितीमध्येही टीयूआय एअरवेजच्या वैमानिकांनी बोईंग ७५७-२०० हे विमान ‘साईडवेज’ पद्धतीने सुखरुपरित्या विमानतळावर उतरवले. साईडवेज पद्धत म्हणजेच विमानचा पुढचा भाग थेट धावपट्टीला समांतर न ठेवता काही विशिष्ट कोनात विमान धावपट्टीच्या जवळ आणायचे आणि मग ते तसेच खाली उतरवायचे. ‘साईडवेज’ लॅडिंग हवाई श्रेत्रामध्ये नवीन नाही. मात्र अशा पद्धतीने विमान उतरवण्यासाठी वैमानिकाला शांतपणे परिस्थिती हाताळण्याबरोबरच आपल्या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात आलेले सर्व कौशल्य वापरावे लागते.

या संदर्भात हफिंग्टन पोस्टशी बोलताना कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना शब्बासकी दिली आहे. तसेच या घटनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या वैमानिकांना कशाप्रकारे उत्तम प्रशिक्षण देतो हेही समोर आल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र कंपनीने या विमानाच्या वैमानिकाचे नाव जाहीर केलेले नाही.