दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ असं म्हणतात, पण जेव्हा दोन महिला भांडत असतील तर तिसऱ्याने मध्ये पडण्याचा शहाणपणा दाखवताना जरा विचार करावा नाहीतर ‘लाभ’ तर बाजूलाच राहू दे पण जन्माची अद्दल मात्र घडू शकते हे नक्की. डेल्डा विमानाच्या वैमानिकाला दोन महिलांची भाडणं सोडवणं फारच महागात पडलं, महिलांची भांडणं सोडवता सोडवता वैमानिकाच्या डोक्याचा असा काही भुगा झाला की बायका ऐकत नाही म्हटल्यावर त्यातल्या एकीच्या त्याने कानशिलात हाणली. बस्स! करायला गेला एक आणि झालं भलतंच. बायकांच्या भांडणात संयम सुटलेल्या या वैमानिकावर नोकरी गमावण्याची वेळ आली.

डेल्टा विमानात असलेल्या दोन महिला प्रवाशांमध्ये एका क्षुल्लक कारणांमुळे वाद झाला, सुरूवातीला शिवीगाळ करण्यापुरता मर्यादित असलेला हा वाद नंतर हाणामारीपर्यंत वाढत गेला. या महिलांमध्ये टोकाची लढाई जुंपली, एकमेकांवर वार करण्याची एकही संधी दोघीही सोडत नव्हत्या. आता या दोघींच्या भांडणात पडणार कोण? त्यांची भांडणं सोडवायची झाली तर आपल्याला पण या काही सोडणार नाही तेव्हा मध्ये न पडण्याचा पवित्रा घेत अनेकजण या महिलांची मारामारी दूरून पाहत होते. शेवटी यांची भांडणं टोकाची वाढली. वैमानिकाने या दोघींनाही बाजूला करण्याचा प्रयत्न केला शेवटी संयम सुटलेल्या या वैमानिकाने एकीच्या श्रीमुखात भडकावली. हे प्रकरण वर पोहोचल्यानंतर वैमानिकावर कारवाई करत त्याला बडतर्फ करण्यात आले. आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असला तरी दोन महिलांच्या भांडणात ‘लाभ’मिळतोच असं नाही, हे या वैमानिकाला कळून चुकलं असेल. आता या प्रकरणानंतर पुढे काही हा वैमानिक कोणा महिलांची भांडणं सोडवायला जाण्याचा शहाणपणा करणार नाही हे मात्र नक्की!