नजर हटी दुर्घटना घटी हे वाक्य आपल्यापैकी अनेकांनी घाटातून प्रवास करताना इशारा म्हणून वाचलं असेल. मात्र केवळ दुर्लक्षच नाही तर कधीतरी अचानक घडलेल्या विचित्र घटनेमुळेही एखाद्याचे प्राण धोक्यात येऊ शकतात. असंच काहीतरी झालं १७ एप्रिल रोजी वांगणी रेल्वे स्थानकामध्ये. मात्र या दुर्घटनेमध्ये अगदी काही सेकंदांसाठी पॉईंटमनने दाखवलेली हिंमत आणि प्रसंगावधानामुळे एका लहान मुलाचे प्राण थोडक्यात बचावले. या पॉईंटमनचं कौतुक थेट रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीही केलं आहे.

पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत पॉईंटमन मयुर शेळकेचं कौतुक केलं आहे. पॉईटमनने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लहान मुलाचा जीव वाचवल्याचं पाहून खूप अभिमान वाटतोय असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं आहे. “मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकातील मयुर शेळकेचा अभिमान वाटतोय की त्याने हिंमत दाखवत एका मुलाचा जीव वाचवला. त्याने केलेलं हे काम कौतुकास्पद आहे. त्याने स्वत:चा जीव धोक्यात टाकत मुलाचे प्राण वाचवले,” असं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नक्की काय घडलं?

मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी म्हणजेच १७ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एक महिला तिच्या लहान मुलासोबत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन चालत होती. अचानक या मुलाचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याचवेळी समोरुन एक्सप्रेस येत होती. मात्र यावेळी प्रसंगावधान राखत तेथे असलेल्या मयुर शेळके या पॉइण्टमनने धावत जात या मुलाला पुन्हा फ्लॅटफॉर्मवर लोटत स्वत:ही एक्सप्रेस येण्याआधी प्लॅटफॉर्मवर उडी घेत मुलाचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही शेअर करण्यात आलाय.

मयुरने केलेल्या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. अगदी रेल्वे मंत्र्यांनाही मयुरच्या या धाडसाची दखल घेत त्याचं कौतुक केलं आहे. दोन तासांमध्ये सात हजारांहून अधिक वेळा रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेला व्हिडीओ रिट्विट करण्यात आला आहे. २५ हजारहून अधिक जणांनी मयुरने दाखवलेल्या या साहसाचं दृष्य कैद झालेलं सीसीटीव्ही फुटेज लाईक केलं आहे. या व्हिडीओवर दोन तासात ११०० हून अधिक कमेंट करण्यात आल्यात.