कधी विमान आकाशात असताना त्यात झालेल्या बिघाडामुळे, तर कधी नवरा बायकोच्या भांडणामुळे विमानाचे आपातकालिन लँडींग करावे लागते. अशाचप्रकारे दुबईहून अॅमस्टरडॅमला जाणाऱ्या एका विमानाचे अचानकपणे लँडिंग करावे लागले. आता अचानक लँडीग करण्यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असेल असे आपल्या सगळ्यांनाच वाटेल. पण याचे कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि पोट धरुन हसाल. विमानातील एक प्रवासी वारंवार वायू उत्सर्जन करत असल्याने इतर प्रवाशांना त्याचा त्रास झाला. हा त्रास अनावर झाल्याने त्यांच्यात भांडणे झाली. ही भांडणे इतकी वाढली की वैमानिकाला अखेर विमानाचे लँडींग करावे लागले.

हे विमान ट्रान्सेविया एअरलाईन्सचे एचव्ही ६९०२ क्रमांकाचे विमान होते. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला गॅसेसचा त्रास होता. तो विमानात बसून सातत्याने वायू उत्सर्जन करत होता. याबाबत इतर प्रवाशांनी वारंवार तक्रारही केली मात्र तरीही तो प्रवासी तसेच करत राहील्याने अखेर विमान लँड करण्याचा निर्णय विमानातील कर्मचाऱ्यांनी घेतला. आता तो प्रवासी कोणत्या आजाराने त्रस्त होता की नाही याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. जेव्हा त्याने आपण गॅसेस उत्सर्जन करणे थांबवू शकत नाही असे सांगितले तेव्हा त्याची इतर प्रवाशांसोबत भांडणेही झाली. या सर्व घटनेनंतर वैमानिकाने विएना इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमान उतरवले. यावेळी विमानात गोंधळ सुरु असल्याने आपण विमान उतरवल्याचे सांगितले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या ४ जणांना विमानातून बाहेर काढण्यात आले.