अनावृत ललनांच्या दिलखूश छायाचित्रांच्या माऱ्यामुळे प्लेबॉय मासिकाचा १९५३ सालापासून जगभर प्रसार झाला. मासिकातील नग्न छायाचित्रे, सेक्स आणि अशाच काही विषयांवरील लेख, चर्चा, मुलाखती यामुळे हे मासिक तुफान गाजलं. जगात कोणत्याही मासिकाला गाठता येणार नाही, इतके खपाचे शिखर प्लेबॉयने हिकमतीने गाठले. असं असलं तरी अनावृत शरीर छब्यांसोबत वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचा झरा प्लेबॉयने कधी आटू दिला नाही. या मासिकाला अनेक देशांत बंदी घालण्यात आली, तरीही या मासिकाची प्रसिद्धी कमी झाली नाही. डिजिटलच्या युगात हे मासिक जगभरातील नेटकऱ्यांमध्ये पोहोचण्यात यशस्वी झालं. प्लेबॉयच्या अधिकृत फेसबुकपेजवर थोडेथोडके नाही तर तब्बल अडीच कोटी फॉलोअर्स होते. पण आता प्लेबॉयनं आपलं अधिकृत फेसबुक पेजच डिलीट केलं आहे. प्लेबॉयनं अधिकृत घोषणा करत आपला #DeleteFacebook ला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.

केंब्रिज अॅनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक चांगलंच वादात सापडलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर व्हॉट्सपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटवर फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन केलं. त्यापाठोपाठ अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी देखील आपल्या ‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचं फेसबुक अकाऊंट डिलीट केलं. यापाऊलावर पाऊल ठेवत प्लेबॉयनं देखील आपलं फेसबुक अकाऊंट डिलीट करत असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. ‘प्लेबॉयचे फेसबुकवर अडीच कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुक डेटा लीक प्रकरण समोर आल्यानंतर आम्ही फेसबुक सोडण्याचा विचार खूपच गांभीर्यानं करत आहोत. फॉलोअर्सच्या माहितीचा गैरवापर होत आहे, आम्ही देखील फेसबुक पेज डिलीट केलं पाहिजे अशी विनंती आमच्या अडीच कोटी फॉलोअर्सनं केल्यानं आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं’ कुपर हेफनर यानं ट्विट करून सांगितलं आहे.

त्यामुळे आता जगभरातील कोट्यवधी ग्राहकांना यापुढे फेसबुकद्वारे येणाऱ्या खुसखुशीत अपडेट्स पाहता येणार नाहीत.