आपण स्वत: भलेही किती संकटात असू परंतु दुसऱ्या लोकांची मदत करणं विसरणार नाहीत, अशा काही व्यक्ती आपल्याला नक्कीच सापडतील. ब्रिटनमधील बर्नले येथे राहणारा जेम्स अँडरसनने एका वृद्ध महिलेला केलेल्या मदतीची सर्वच स्तरातून स्तुती होत आहे. जेम्स हा ब्रिटनमध्ये स्वत:ची प्लंबिंग कंपनी चालवतो. 91 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातील बॉयलर त्याने मोफत दुरूस्त करून दिलं. त्यानंतर सोशल मीडियावरूनही त्यांची स्तुती होत आहे. त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर जगभरातील नेटकऱ्यांकडून त्याला तब्बल 70 लाखांचं डोनेशन मिळालं आहे.

एका घरातील बॉयलर दुरूस्तीसाठी जेम्सला बोलावण्यात आलं होतं. जेव्हा तो बॉयलर दुरूस्तीसाठी संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचला तेव्हा त्या ठिकाणी असलेली वृद्ध महिला ब्लड कॅन्सरनेही ग्रस्त असल्याचं त्याला समजलं. काम पूर्ण झाल्यानंतर जेम्सने जेव्हा त्यांच्या हातात बिल दिलं तेव्हा त्यावर त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेण्यात येणार नसल्याचं लिहिल्याचं दिसलं. तसंच त्यांच्या सेवेसाठी कायमच आपण उपलब्ध राहू असं म्हणत त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही आपल्या कंपनीची आहे.

त्या वृद्ध महिलेच्या मुलीने त्यानं दिलेल्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर त्यांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केलं तसंच जेम्सची स्तुतीही केली. जेम्सने यापूर्वीही अनेकदा वृद्ध व्यक्तींची मदत केली आहे. 2017 मध्ये जेम्सने त्याच्या कंपनीची सुरूवात केली. ज्यांच्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत किंवा जे मदत मागण्यासाठी घाबरतात अशा वृद्ध किंवा दिव्यांग व्यक्तींची मदत करणं आपल्याला आवडतं, असं जेम्स सांगतो. असे अनेक लोकं आहेत जे शांतपणे सर्व समस्यांचा सामना करत असतात. त्यांच्या समस्या कमी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, असं तो म्हणतो. सध्या जेम्ससमोरही अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. नुकतंच त्याला आपल्या कंपनीतील दोन जणांना कामावरून कमी करावं लागलं. त्याच्यावर सध्या 8 हजार पौंड्सचं कर्ज आहे. असं असूनही जेम्स सध्या गरजूंच्या मदतीला धावून जातो. भविष्य काळात आपलं हे काम आणखी मोठं होऊल आणि कोणत्याही वृद्ध व्यक्तीला त्रास सहन करावा लागणार नाही, अशी आशा तो व्यक्त करतो.