प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी दूरचित्र माध्यमाद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नाला आधी सामोरे जावे असा सल्ला दिला. त्यावरुनच कुणाल कामराने मोदींचं नाव न घेता टीका केली आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी दूरचित्र माध्यमाद्वारे संवाद साधला. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि परीक्षेला घाबरू नका, तर स्वत:त सुधारणा करण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहा, असे आवाहन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी कठीण प्रश्नाला आधी सामोरे जावे असे मोदींनी सांगितले. “जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. उलट कठीण असतं त्याला आधी सामोरे जा. परीक्षेत असं म्हटलं जातं की सोपं आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा”, असं मोदी म्हणाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनातील उदाहरण देताना मोदींनी, मी माझी सकाळ कठीण निर्णय घेऊन सुरू करतो असं सांगितलं. हाच धागा पकडून कुणालने मोदींवर टीका केली आहे.

“असंच असेल तर पुढच्यावेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा”, अशा आशयाचं बोचरं ट्विट कामराने केलं आहे. सोबत त्याने ‘कठीण प्रश्न पहिले सोडवावे’ हा मोदींनी विद्यार्थ्यांना दिलेला सल्लाही पोस्ट केलाय. पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांना एकही मुलाखत दिलेली नाही, कुमार यांनी मध्यंतरी मुलाखतीचं आवाहन दिलं होतं. त्यानंतरही अद्याप मोदींनी त्यांना मुलाखत दिली नाही, पण पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मात्र ते मुलाखत देतात यावरुनच कुणाल कामराने निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय.


दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ हा कार्यक्रम पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी १३ लाखांहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी केली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रथमच सर्व जगातील इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्यांच्या मनातील भीती, आकांक्षा, चिंता आणि सूचनांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करण्याची संधी देण्यात आली होती.