हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलामधील इंडियन कॉफी हाऊस सील करण्यात आलं आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या कॉफी हाऊसपैकी एक आहे. या कॉफी हाऊसमध्ये काम करणारा एक कर्मचारी काही दिवसांपूर्वी कोणत्याही प्रकारचा पास आणि परवानगी न घेता शिमल्यामध्ये दाखल झाला. या व्यक्तीने आधी टॅक्सीने आणि नंतर शिमल्यापर्यंत बसने प्रवास केला. हा कर्मचारी थेट कॅफेमध्ये दाखल झाल्याने एकच गोंधळ उडाला. हा कर्मचारी दिल्लीमधील करोना रेड झोन असणाऱ्या रोहिणी परिसरातील रहिवाशी आहे. हा कर्मचारी परतल्यानंतर थेट कॅफेच्या स्वयंपाकघरात जाऊन आपल्या कामाला सुरुवात करु लागला. याबद्दल कॅफेच्या व्यवस्थापकाला इतर कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर या कर्मचाऱ्याकडे व्यवस्थापकाने पास तसेच करोना चाचणीचा रिपोर्ट मागितला. त्यावेळी संतापलेल्या या कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाला शिवीगाळ केला. कॅफे व्यवस्थापकाने तातडीने यासंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. या व्यक्तीला आता क्वारंटाइन करण्यात आलं असून बेजबाबदार वागणूकीबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून काही दिवस कॅफे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कॅफेमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे.

शिमल्याचे जिल्हा उपायुक्त अमित कश्यप यांनी यासंदर्भात माहिती देताना कॅफेमधील एक कर्मचारी पास न घेताच दिल्लीवरुन कॅफेत आल्याचे समजल्यानंतर कॅफे सील करण्यात आल्याचे सांगितले. या कर्मचाऱ्याची करोना चाचणी करण्यात आली आहे. हा कर्मचारी बसने शिमल्यामध्ये आला. त्याच्याकडे कोणताही पास किंवा जिल्ह्यात प्रवेश करण्यासंदर्भातील परवानगी नव्हती असंही कश्यप यांनी सांगितल्याचे नेटवर्क १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. कॅफे हाऊसमध्ये काम करणारा हा कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीमधील आपल्या रोहिणी येथील घरात राहत होता. त्याने परत येताना कोणताही पास तयार केला नव्हता. नवीन नियमांनुसार पास असल्याशिवाय हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश देण्यात येत नाही.

मोदी आणि कॅफे कनेक्शन

२०१७ मध्ये हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीत एकहाती विजय मिळाल्यानंतर शिमल्यामध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. हा कार्यक्रमानंतर हेलीपॅडकडे जाताना मोदींचा ताफा शिमल्यातील प्रसिद्ध अशा इंडियन कॉफी हाऊस समोर थांबला होता कारण मोदींना तेथील कॉफी प्यायची होती. हे कॉफी शॉप म्हणजे मोदींचा कॉफीचा जुना अड्डा आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण मोदी स्वत: पक्ष कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तसेच पक्षासंदर्भातील इतर कामांसाठीही जेव्हा शिमल्यात येत असतं तेव्हा आवर्जून येथे थांबून कॉफीचा आस्वाद घ्यायचे. २०१७ च्या या कॅफे भेटीसंदर्भात मोदींनी ट्विटही केलं होतं.

इंडियन कॉफी हाऊस बद्दल

इंडियन कॉफी हाऊस हे शिमल्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. शिमल्याला जाणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या कॉफी शॉपला भेट द्यावी असं अनेकजण सांगतात. येथील कॉफीची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते असं अनेकजण सांगतात. त्यामुळेच हे कॉफी शॉप पर्यटकांबरोबरच स्थानिकांमध्येही लोकप्रिय आहे.

लोक येतात आणि जातात मात्र येथील कॉफीचा दरवळ कधीच कमी होत नाही असं ‘द हिल पोस्ट’ या वेबसाईटवरील एका लेखामध्ये या कॅफे शॉपबद्दल लिहीताना म्हटले आहे. चॅटरुम, गॉसिप, घोटाळे, काद्यासंदर्भातील गप्पा, अफवा, गोष्टी, राजकारण, वादविवाद, चर्चा असं सर्व सर्व काही करण्याचे शिमल्यातील लोकप्रिय ठिकाण म्हणजे हे जुने इंडियन कॉफी हाऊस. शिमल्यातील अनेकजणांसाठी भेटण्याची जागा असणारे हे मॉल रोडवरील इंडियन कॉफी हाऊस १९५७ साली सुरु झाल्याचेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.