पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ व्या आशियाई परिषदेसाठी फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये आहेत. यावेळी मोदींनी तिथल्या ९ वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी खास वेळ काढला. कार्लो माईगेल असं त्याचं नाव असून, तो फिलिपीन्सच्या बुलाकन प्रांतात राहतो. ‘जयपूर फूट’ लावलेल्या हजारो मुलांपैकी तो एक आहे, याच प्रोस्थेटिक पायामुळे कार्लो चालू शकतो.

Video : ‘iPhone X’ चे FaceID फीचर खरंच सुरक्षित आहे का?

मोदींच्या भेटीदरम्यान ‘जयपूर फूट’मुळं आपलं वावरणं खूप सोपं झाल्याचं त्यानं मोठ्या आनंदानं सांगितलं. मनीलातील ‘महावीर फिलिपीन्स फाऊंडेशन’मध्ये त्याची मोदींशी भेट झाली. मोठा झाल्यावर पोलीस खात्यात जाणार असल्याचंही त्याने या भेटीदरम्यान मोठ्या अभिमानाने सांगितले. मोदींनी ट्विट करून छोट्या कार्लोच्या आणि आपल्या भेटीची माहिती दिली. ‘मला पोलीस व्हायचं आहे, असं मोठ्या आनंदने माझ्या छोट्या मित्राने मला सांगितले आहे. चालता येऊ न शकणाऱ्या त्याच्यासाख्या अनेक मुलांना जयपूर फूटमुळे आशेचे पंख मिळाले हे पाहून मला अधिक आनंद झाला’ असं ट्विट मोदींनी केलं आहे.’ जयपूर फूटमुळे फिलिपाइन्समधील जवळपास १५ हजार लोकांना नवीन जीवन मिळाले आहे.