बोगदा हा प्रकार कोकण रेल्वेने जाणाऱ्या किंवा पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे ने जाणाऱ्या लोकांसाठी नेहमीचाच. अर्थात राज्यात आणि देशात इतरही ठिकाणी बोगदे आहेत पण जरा ग्लॅमरस आणि प्रसिध्द बोगदे या दोन मार्गांवरचेच.

आता या बोगद्यांची लांबी ती केवढी. एक्स्प्रेसवेवरचा भातणचा बोगदा साधारण एक किलोमीटरचा आहे. तर कोकण रेल्वेवरचा रत्नागिरीतला एक बोगदा तब्बल साडेसहा किलोमीटरचा आहे.

पण आता या बोगद्यालाही भारी पडेल असा एक बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये तयार होतोय. हा बोगदा ९ किलोमीटर एवढ्या प्रचंड लांबीचा असणार आहे. श्रीनगर ते जम्मू अशा जाणाऱ्या या बोगद्याचं २ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

९.२८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा त्याच्या या अवाढव्य लांबीमुळे देशातला सर्वात मोठा बोगदा तर ठरणारच आहे. पण तो जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील राज्यात निर्माण होत असल्यानेही महत्त्वाचा असणार आहे.या बोगदयामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर ३० किलोमीटरने कमी होणार असून यामुळे दरदिवशी २७ लाख रूपयांचं इंधनही वाचणार आहे. नशरी ते चेनानी असा हा बोगदा बांधण्यात आला आहे.

या बोगद्याचं काम मे २०१६ मध्येच पूर्ण होणार होतं पण अनेक कारणांमुळे हे काम काही महिने पुढे जात राहिलं. हा बोगदा बांधायला ३७०० कोटी रूपयांचा खर्च आला आहे. २ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचं उद्घाटन होत तो सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यासा दुजोरा दिला. या बोगद्याचं उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं.