मी सोशल मीडिया सोडू इच्छितो अशा प्रकारचं एक आश्चर्यकारक ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलं होतं.. येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडू इच्छितो, असं त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करु इच्छितो असं बुचकळ्यात पाडणारं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. @narendramodi या ट्विटर हँडलवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. याबाबत येत्या रविवारी मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, अशा आशयाची पोस्ट राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. मोदींच्या या संकेतांनंतर ही पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना ‘ट्रोल्स’ च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत, अशा शब्दांत राज यांनी टीका केली होती. तर दुसरीकडे परतीचा पाऊस असं त्यांनी काढलेलं व्यंगचित्रही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 8:05 am