पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेहमीच्या वापरातील कार बीएमडब्ल्यूची ७ सिरीज आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावर जाताना मोदींनी ही नेहमीची कार वापरली नाही. आता असे का केले याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. पण त्यांनी अचानक आपली गाडी बदलल्याने अनेकांना आश्चर्यही वाटले. मग नेमक्या कोणत्या गाडीने ते लाल किल्ल्यावर पोहोचले याबाबत सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे. मंगळवारी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोदी काळ्या रंगाच्या लॅंड रोवर कंपनीच्या रेंज रोवर कारने लाल किल्ल्यावर गेले. या मॉडेलचे नाव 2010 Range Rover HSE  असे आहे. मूळची जर्मन कंपनी असलेल्या या कारची वैशिष्टे जाणून घेऊयात

या कारमध्ये ५ लीटरचे व्ही८ हे इंजिन आहे. या वाहनाची क्षमता ३७५ ब्रेक हॉर्स पॉवर (बीएचपी) इतकी आहे. यामध्ये ६ वेगवान ऑटोमॅटीक ट्रान्समीशन यंत्रणा देण्यात आली आहे. ही गाडी ० ते ९६ किलोमीटर प्रति तास इतका वेग केवळ ७.२ सेकंदांमध्ये पार करते. सुरक्षेच्या दृष्टीनेही ही गाडी अतिशय चांगली असून त्यामध्ये रडार बेस अॅडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, ऑप्शनल सराऊंड कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे गाडीचा चालक गाडीच्या चारही बाजूचे पाहू शकतो.

संपूर्ण गाडीमध्ये एअरबॅग्ज, सीटबेल्ट, साईड इंपॅक्ट बीम देण्यात आले आहेत. यामध्ये इतरही अनेक सुविधा देण्यात आल्या असून ती अतिशय आरामदायी आहे. ही कार ऑफ रोडसाठीही बादशाह मानली गेली असून खडकाळ भाग, बर्फाळ भाग यांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने धावते. अशा सर्व सुविधा असलेली ही कार मोदींनी अचानकपणे लाल किल्ल्यावर येण्यासाठी का वापरली याचे उत्तम मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.