माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. प्रवण मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच कोविड-१९ च्या प्रोटोकॉलनुसार, माजी राष्ट्रपतींचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी गन कॅरेजऐवजी शववाहिकेतून लोधी रोड येथील स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी दिल्लीतील १० राजाजी मार्ग येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याचवेळी क्लिक करण्यात आलेला एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

१० राजाजी मार्ग येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं. त्याचबरोबर उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले. याच वेळी काढण्यात आलेल्या तीन नेत्यांचे फोटो काँग्रेसकडून सध्या सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विटवरुन राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली अर्पण करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. “धर्माचे ठेकेदार म्हणून मिरवणाऱ्यांचा ना धर्माशी काही संबंध आहे ना संस्कृतीशी ना ज्ञानाशी. बाकी सारं काही फोटोत दिसत आहे,” अशी कॅप्शन श्रीनेत यांनी या फोटोला दिली आहे.

काय आहे फोटोमध्ये ?

श्रीनेत यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवाच्या पाया पडत श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. मात्र पार्थिवाच्या पाया पडताना राहुल गांधींनी पादत्राणे काढली असून इतर दोन्ही नेत्यांनी पादत्राणे काढलेली नाहीत असं श्रीनेत यांनी फोटो पोस्ट करत दाखवलं आहे. मोदी आणि केजरीवाल यांनी पादत्राणे घालूनच प्रणव मुखर्जींच्या पार्थिवाला नमस्कार केला तर राहुल गांधींनी पादत्राणे काढून श्रद्धांजली वाहिली असं श्रीनेत यांना सूचित करायचं आहे.


हा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून श्रीनेत यांनी पोस्ट केलेला फोटोच तीन हजारहून अधिक जणांनी रिट्विट करत शेअर केला आहे. तर १३ हजारहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे.