जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हा आमचा अंतर्गत विषय आहे हे भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे. पण तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याचा उत्साह दाखवत असतात. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची तयारी दाखवली तेव्हाच भारताने त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. पण त्यानंतरही ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल झाला नाही. त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे काश्मीरच्या विषयात मध्यस्थीची इच्छा बोलून दाखवली.

काल अमेरिकेत ह्युस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात ट्रम्प मुख्य अतिथी होते. त्यावेळी Article 370 बरोबर भारतीयांच्या भावना कशा जोडलेल्या आहेत ते त्यांच्या लक्षात आले असावे. मोदी यांच्या तोंडातून Article 370 हे शब्द निघताच एनआरजी स्टेडियममध्ये जमलेल्या ५० हजार भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीकांनी एकच जल्लोष सुरु केला. कार्यक्रमासाठी आलेल्या भारतीय वंशाच्या नागरीकांनी मोदी, मोदीचा घोष सुरु केला आणि संपूर्ण स्टेडियम दणाणून सोडले.

कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर, लडाखची जनता विकास, समानअधिकारापासून वंचित होती. याचा लाभ दहशतवाद्यांनी उचलला. आता ते सर्व अधिकार जम्मू-काश्मीर, लडाखच्या जनतेला मिळाले आहेत हे शब्द मोदींनी उच्चारताच संपूर्ण स्टेडियममध्ये टाळयांचा एकच कडकडाट झाला. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा करुन झाला. राज्यसभेत भाजपाकडे बहुमत नाही. पण दोन तृतीयांश खासदारांच्या सहमतीने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदी हे सांगत असताना ट्रम्प त्यांच्यासमोर बसले होते. मोदींच्या आवाहनानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी हा निर्णय घेणाऱ्या भारतातील खासदारांना उभे राहून मानवंदना दिली.